२१.५ कोटी रुपयांना विकला गेला 'हा' २७८ किलो वजनी मासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 10:30 AM2019-01-08T10:30:15+5:302019-01-08T10:35:45+5:30
टूना या माशाला इतकी किंमत मिळण्याचा हा एक नवा रेकॉर्ड कायम झाला आहे. या माशाचं वजन २७८ किलोग्रॅम होतं.
जपानमध्ये पुन्हा एकदा ब्लूफिन टूना मासा चर्चेत आला आहे. टोकियोचा उद्योगपती कियोशी किमुराने बाजारातून वर्षाच्या पहिल्या लिलावातून हा मासा २१.५ कोटी रुपयांना खरेदी केला. या माशाला इतकी किंमत मिळण्याचा हा एक नवा रेकॉर्ड कायम झाला आहे. या माशाचं वजन २७८ किलोग्रॅम होतं. हा खरेदी करणारा व्यक्ती हा सूशी हॉटेल चेनचा मालक आहे.
टूना किंगच्या नावाने लोकप्रिय असलेल्या कियोशी किमुराने या माशासाठी ३३३.६ मिलियन येनची बोली लावली होती. भारतीय मुद्रेत ही रक्कम २१.५ कोटी रुपये इतकी होते. ही किंमत २०१३ मध्ये लावण्यात आलेल्या १५५ मिलियन येन(९ कोटी ९३ लाख रुपये) पेक्षा दुप्पट आहे. २०१३ मध्येही किमुराने हा मासा विकत घेतला होता.
किमुरा सांगतात की, 'हा बेस्ट टूना मासा आहे. मी एक ताजा आणि स्वाटिष्ट मासा खरेदी करण्यात यशस्वी झालो. वास्तवात जसा विचार केला होता, किंमत त्यापेक्षा जास्त होती. पण मला विश्वास आहे की, आमचे ग्राहक टूना माशाच्या टेस्टचा आनंद घेतील'.
टूना माशाची खासियत
ब्लूफिन टूना मासा फारच दुर्मिळ आहे. हा मासा जपानच्या उत्तर तटावर पकडला गेला. यापासून तयार होणारी डिश जपानी लोकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. माशाचा हा प्रकार नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. या माशाची मागणी जास्त असल्याने याची जास्त प्रमाणात शिकार केली जात आहे.