जपानमध्ये पुन्हा एकदा त्सुनामीची चर्चा; या रहस्यमयी माशामुळे वाढली चिंता!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 03:11 PM2019-02-27T15:11:22+5:302019-02-27T15:18:36+5:30
जपानमध्ये ११ मार्च २०११ साली आलेल्या भूकंपाने आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती हे सर्वांनीच पाहिलं होतं.
जपानमध्ये ११ मार्च २०११ साली आलेल्या भूकंपाने आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती हे सर्वांनीच पाहिलं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे २० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा भूकंप आणि त्सुनामीची चर्चा जपानमध्ये होऊ लागली आहे. आणि याचं कारण आहे समुद्रात आढळून आलेले दुर्मिळ मासे.
काही दिवसांपूर्वी जपानच्या ओकिनावा द्वीपाजवळ मच्छिमारांना समुद्रात १३ फूट लांब दोन ओरफिश दिसल्या होत्या. जपानमध्ये असं मानलं जातं की, हा मासा दिसल्यावर तिथे भूकंप आणि त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती येते. नंतर या माशांना पकडण्यात आले. मच्छिमारांचं म्हणणं आहे की, हे मासे फार रहस्यमयी आढळून आले.
तज्ज्ञांनुसार, सामान्यपणे ओरफिश समुद्रात १ हजार ते ३ हजार फूट खोलीवर असतात. हे मासे समुद्र सपाटीवर तेव्हाच येतात जेव्हा समुद्रात काही हालचाल होते. या माशांकडे भूकंपाच्या संकेतसारखं पाहिलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसात जपानमध्ये मच्छिमारांना एकूण सात मासे मिळाले आहेत.
याआधी ओरफिश नावाच्या माशांना जपानमध्ये समुद्र तटावर २०११ मध्ये पाहिलं गेलं होतं. त्यानंतर जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी आली होती. त्यात २० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच आता पुन्हा एकदा जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची चर्चा होऊ लागली आहे.
असे असले तरी तज्ज्ञांनी मात्र जपानमध्ये भूकंप येणार असल्याचं नाकारलं आहे. त्यांचं मत आहे की, याचा काहीही पुरावा नाही की, हे मासे भूकंपाचा येणार असल्याचा संकेत देतात. काही पर्यावरणातील बदलांमुळे हे मासे कदाचित वर आले असतील.