गळ्यात ड्रॅगनफ्लाय पेंडंट घातल्यावर डास छुमंतर होणार, जापनीज कंपनीचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:46 PM2022-06-26T18:46:47+5:302022-06-26T18:46:56+5:30

एका जपानी कंपनीनं यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी चतुराच्या (Dragonfly) आकाराचं एक पेंडंट तयार केलं आहे. हे पेंडंट घातल्यामुळे डास दूर राहतील, असा दावा कंपनीनं केला आहे.

Japanese company claims dragon fly pendent will keep mosquitoes away | गळ्यात ड्रॅगनफ्लाय पेंडंट घातल्यावर डास छुमंतर होणार, जापनीज कंपनीचा अजब दावा

गळ्यात ड्रॅगनफ्लाय पेंडंट घातल्यावर डास छुमंतर होणार, जापनीज कंपनीचा अजब दावा

googlenewsNext

डासांची समस्या सार्वत्रिक आहे. पावसाळा सुरू झाल्यावर तर डासांची उत्पत्ती वाढते. डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होतात. वेळीच उपचार केले नाही, तर जिवावरही बेतू शकतं. म्हणूनच डास चावू नयेत, म्हणून काळजी घ्यायला हवी. डासांना प्रतिबंध करण्यासाठी (Keep Away Mosquitoes) वेगवेगळी क्रीम, रोलऑन किंवा इलेक्ट्रिक उपकरणं सध्या उपलब्ध आहेत. डास मारण्यासाठी रॅकेटही असते; पण हे सगळं करूनही डास आपल्या आजूबाजूला असतातच. एका जपानी कंपनीनं यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी चतुराच्या (Dragonfly) आकाराचं एक पेंडंट तयार केलं आहे. हे पेंडंट घातल्यामुळे डास दूर राहतील, असा दावा कंपनीनं केला आहे.

आकाशात उडणाऱ्या चतुराशी अनेक लहान मुलं खेळतात. त्याला हेलिकॉप्टर अशा नावानंही मुलं हाक मारतात. कारण त्याचा आकार हेलिकॉप्टरसारखा असतो. या किड्याला ड्रॅगनफ्लाय असं म्हणतात. डेलीमेल वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, हे कीटक पृथ्वीवरचे सर्वांत यशस्वी शिकारी मानले जातात. एका संशोधनानुसार, व्याघ्र वर्गातल्या प्राण्यांच्या तुलनेत चतुरांचा शिकार पकडण्याचा दर अधिक असतो. याचाच उपयोग डासांना पळवण्यासाठी केला आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एका जपानी कंपनीनं डासांना दूर पळवण्यासाठी ड्रॅगनफ्लायच्या आकाराचं पेंडंट (Dragonfly Pendant) तयार केलं आहे. हे गळ्यात घालण्याचं लॉकेट आहे. त्याला ड्रॅगनफ्लायचा आकार देण्यात आला आहे. ते घातल्यावर डास किंवा इतर किडे त्या व्यक्तीपासून लांब राहतील. म्हणजेच कोणतंही केमिकल किंवा धुराशिवाय डासांना लांब ठेवता येऊ शकेल.

ड्रॅगनफ्लाय म्हणजे चतुर हे उत्तम शिकारी कीटक असतात. त्यांचा शिकार करण्याचा सक्सेस रेट 95 टक्के आहे. त्यांना पाहूनसुद्धा किडे, डास पळून जातात. त्यामुळे हे पेंडंट घातल्यावर ते घातलेल्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता डास दूर पळतील, असा दावा मिकी लोकोस (Miki Locos Co. Ltd.) या जपानी कंपनीने केला आहे.

हे पेंडंट पीव्हीसीपासून तयार केलं आहे. त्याची लांबी 100 मिलीमीटर आहे, तर एका पंखापासून दुसऱ्या पंखापर्यंतची रुंदी 130 मिलीमीटर आहे. हे गळ्यात घालण्याचं पेंडंट आहे; मात्र यासोबत एक क्लिपही येते. त्याचा वापर करून हे पेंडंट कपड्यावर कुठेही लावता येतं. त्यामुळे डास, किडे, माश्या, मधमाशी असे कीटक तुमच्यापासून लांब राहतील, असा दावा कंपनीनं केला आहे. ट्विटरवर काही ग्राहकांनी या पेंडंटबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. डासांना पळवण्यासाठीची ही शक्कल कदाचित यशस्वी होईलही. तसं झाल्यास, डासांमुळे हैराण झालेल्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल.

Web Title: Japanese company claims dragon fly pendent will keep mosquitoes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.