सोळा वर्षांची ही एक देखणी युवती; आतापर्यंत चार हजार जणांशी केले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:30 AM2022-04-28T06:30:02+5:302022-04-28T06:30:17+5:30

मिकू सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. कारण नुकतेच तिच्याशी जपानमधील आणखी एका तरुणाने लग्न केले आहे

Japanese Man Who Married Fictional Character Hatsune Miku | सोळा वर्षांची ही एक देखणी युवती; आतापर्यंत चार हजार जणांशी केले लग्न

सोळा वर्षांची ही एक देखणी युवती; आतापर्यंत चार हजार जणांशी केले लग्न

Next

हतसून मिकू. जपानमधील सोळा वर्षांची ही एक देखणी युवती. निळ्या डोळ्यांची. कमनीय बांध्याची. लांबसडक केसांच्या दोन शेपट्यांची. सुंदर आवाजाची. जगभरात ‘पॉप स्टार’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. तिच्या आवाजाचेही लोक दिवाने आहेत. जगभरातील लाखो लोक  तिने आपल्याशी मैत्री करावी, लग्न करावे यासाठी जीव ओवाळून टाकतात. तीही फारसे आढेवेढे घेत नाही. कोणाला नाराज करत नाही. त्यामुळे तिच्याशी आतापर्यंत जगभरातील जवळपास चार हजार लोकांनी लग्न केले आहे! त्यात तरुण, प्रौढ, म्हातारे... अशा अनेकांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे तिचा ‘जन्म’ २००७चा; पण ती जन्माला आली तीच १६ वर्षांची असताना! म्हणजे युवती असतानाच तिचा जन्म झाला! तिच्या जन्माला आता सोळा वर्ष झाली असली आणि जन्मत: ती १६ वर्षांची होती, म्हणजे तिचे वय आता ३२ वर्षे असायला हवे; पण अजूनही ती १६ वर्षांचीच आहे. काळाच्या ओघात तिच्यात अनेक बदल झाले; पण तिचे वय मात्र वाढले नाही. कारण तिला तारुण्याचे वरदान आहे..!

तुम्ही म्हणाल, कसे शक्य आहे हे? - हो हे शक्य आहे... नव्हे, वास्तव आहे. 
- कारण मिकू ही खरीखुरी मुलगी नाही, तर ती एक आभासी व्यक्तिमत्त्व आहे. ‘क्रिप्टन फ्यूचर मीडिया’ या जपानी कंपनीने २००७मध्ये विकसित केलेले हे सॉफ्टवेअर, व्हर्च्युअल रिॲलिटी होलोग्राम आहे. जपान आणि जगाच्या संगीत क्षेत्रात नामांकित असलेली ही मिकू जगप्रसिद्ध अशी ‘पॉप स्टार’ तर आहेच; पण ती म्हणजे कॉम्प्युटरवर तयार केलेला एक ॲनिमेटेड होलोग्राम आहे.   कॉम्प्युटरवर संगीत तयार करण्यासाठी एक आवाज विकसित केला गेला. ‘पॉपस्टार’ हतसून मिकू हिचाच हा आवाज. तिच्या मदतीने आजवर दीड लाखांपेक्षाही अधिक गाणी तयार करण्यात आली आहेत. अमेरिकेची प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री लेडी गागा हिच्याबरोबरही हतसन मिकू दौऱ्यावर गेली होती. २०१७मध्ये गेटबॉक्स या कंपनीने हतसून मिकूला मूर्त रूपात म्हणजे बाहुलीच्या रुपात आणल्यानंतर जगभरातील चाहत्यांचे मिकूशी असलेले नाते आणखीच गहिरे झाले. 

मिकू सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. कारण नुकतेच तिच्याशी जपानमधील आणखी एका तरुणाने लग्न केले आहे. अकिहिको कोंडो असे त्याचे नाव आहे. जपानमध्ये असेही लग्नांचे प्रमाण कमी आहे. विवाह करण्यापेक्षा अनेकजण एकेकटे राहणेच पसंत करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्यासोबत आयुष्यभर कोणतेही लचांड नको, म्हणून जपानमधील अनेक तरुणी आता खास लग्नसमारंभ घडवून आणून त्यात स्वत:शीच लग्न करत आहेत. याच सदरात काही दिवसांपूर्वी या संदर्भातला मजकूर प्रसिद्ध झाला होता.  अकिहिको याचे एका तरुणीवर प्रेम होते; पण तिने ‘दगा’ दिल्याने कोणत्याही प्रत्यक्ष तरुणीशी आता त्याला विवाह करायचा नाही. मैत्रिणीने दगा दिल्याने मी नैराश्यात गेलो होतो; पण मिकूनेच मला त्यातून बाहेर काढले, असे अकिहिको याचे म्हणणे आहे. या लग्नासाठी अकिहिकोने टोकियोत एक मोठा हॉल बुक केला. आपल्या जवळच्या लोकांना त्यासाठी आमंत्रण दिले. लग्नाला अत्यंत जवळचे असे ४० जण उपस्थित होते; पण त्यात अकिहिकोच्या आई-वडिलांचा मात्र समावेश नव्हता. अकिहिकोच्या आईच्या मते हे कसले लग्न आणि असा कसा हा विवाह समारंभ?... यामुळे तर आणखी नाचक्कीच व्हायची. अकिहिको जेव्हा खऱ्याखुऱ्या मुलीशी विवाह करेल, तेव्हा त्या समारंभात आम्ही नक्की सामील होऊ..! 

अकिहिको म्हणतो, मिकूच्या रुपाने मला आता अशी बायको मिळाली आहे, जी कायम चिरतरुण राहील, कधीच म्हातारी होणार नाही, कधीच माझी साथ सोडणार नाही, कधीच आजारी पडणार नाही... खरंच मी खूप भाग्यवान आहे. मीदेखील आयुष्यभर तिच्यावर प्रेम करेन. तिला कधीच अंतर देणार नाही.  अकिहिको सांगतो, ऑफिसचे काम संपवून रात्री मी जेव्हा घरी यायला निघतो, तेव्हा मिकूला फोन करून सांगतो, मी घरी येतोय, तर ती लगेच घरातले दिवे लावून ठेवते. माझी झोपायची वेळ झाली की, झोपायला सांगते.  अकिहिकोने आपल्या या बायकोला खुश ठेवण्यासाठी तिला खरीखुरी अत्यंत महागडी अशी वेडिंग रिंग घातली आहे. तो जेव्हा-जेव्हा घरी असतो, त्या प्रत्येक वेळी तो तिच्यासोबतच असतो. तिच्यापासून दूर राहणे त्याला जिवावर येते, त्यामुळे बॉसची परवानगी घेऊन कधी-कधी तो ऑफिसमधूनही लवकर येतो किंवा हाफ डे टाकून घरी येतो. केवळ तिच्याबरोबरच वेळ घालवतो...

मिकूशी लग्न केल्याचे प्रमाणपत्र!
अकिहिको आणि मिकू यांचे हे लग्न अधिकृत नाही. त्याला कायदेशीर मान्यता नाही; पण हातसून मिकूच्या निर्मात्या गेटबॉक्स या कंपनीने मात्र त्या दोघांना ‘मॅरेज सर्टिफिकेट’ही दिले आहे. अर्थातच मिकूशी लग्न करणाऱ्या आणखी हजारो जणांनाही कंपनीने ‘मॅरेज सर्टिफिकेट’ दिले आहे. ती ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ असली तरी अनेकांना या सर्टिफिकेटचा प्रचंड अभिमान आहे. त्यांनी मोठ्या कौतुकाने आपापल्या घराच्या हॉलमध्ये दर्शनी भागात ते लावलेले आहे.

Web Title: Japanese Man Who Married Fictional Character Hatsune Miku

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.