एक असं बेट जिथे महिलांना जाण्यास आहे बंदी, पुरूषांनाही पाळावे लागतात कठोर नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 03:22 PM2024-01-06T15:22:08+5:302024-01-06T15:22:39+5:30
आज आम्ही तुम्हाला अशाच एका बेटाबाबत सांगणार आहोत, जिथे महिलांना जाण्यास बंदी आहे.
जगभरात अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत ज्यांच्याबाबत नेहमीच चर्चा केली जाते. कारण ही ठिकाणे वेगवेगळ्या कारणांनी रहस्यमय तर असतातच सोबतच येथील काही नियमही हैराण करणारे असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बेटाबाबत सांगणार आहोत, जिथे महिलांना जाण्यास बंदी आहे. हे बेट जपानमध्ये असून त्याचं नाव ओकिनोशिमा बेट असं आहे.
या बेटाची खासियत म्हणजे या बेटाला धार्मिक रूपाने फार पवित्र मानलं जातं. जुन्या काळापासून पाळले जाणारे येथील काही नियम आजही या बेटावर पाळले जातात. या नियमांपैकी एक म्हणजे इथे महिलांना येण्यास बंदी आहे.
ओकिनोशिमा बेटाला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज जाहीर केलं आहे. 700 वर्ग मीटरमध्ये पसरलेल्या या बेटाबाबत म्हटलं जातं की, चौथ्या ते नवव्या शतकापर्यंत हे ठिकाण कोरिया प्रायद्वीप आणि चीन यांच्यात व्यापाराचं एक केंद्र होतं.
असं सांगितलं जातं की, महिलांना बेटावर बंदी तर आहेच सोबतच पुरूषांसाठी काही कठोर नियमही आहेत. या बेटावर जाणाऱ्या पुरूषांना निर्वस्त्र होऊ आंघोळ करणं गरजेचं असतं. इतकंच नाही तर इथे वर्षातून केवळ 200 पुरूषांनाच येण्याची परवानगी आहे.
जे लोक या बेटावर जातात त्यांना ताकीद दिली जाते की, त्यांनी तेथून कोणतीच वस्तू आणू नये. तसेच इथे जात असल्याचंही कुणाला सांगू नये. एका रिपोर्टनुसार, तेथून कुणी साधं गवतही सोबत आणू शकत नाही.
या बेटावर मुनाकाता ताइशा ओकित्सु मंदिर आहे. या मंदिरात समुद्राच्या देवीची पूजा केली जाते. 17 व्या शतकात इथे जहाजांच्या सुरक्षेसाठी पूजा केली जात होती.