Jara Hatke: ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पुन्हा ‘एलियन’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:53 AM2022-04-06T05:53:58+5:302022-04-06T05:54:29+5:30
Jara Hatke: ‘कुणीतरी आहे तिथे’... आता तिथे म्हणजे कुठे, तर अर्थातच परग्रहावर! आपल्या शेजारी असणाऱ्या परग्रहांवर सजीवसृष्टी असू शकते आणि मानवापेक्षाही बुद्धिमान प्राणी तेथे असू शकतात, असं सर्वसामान्य लोकांनाच नाही, तर संशोधकांनाही वाटतं.
‘कुणीतरी आहे तिथे’...
- आता तिथे म्हणजे कुठे, तर अर्थातच परग्रहावर! आपल्या शेजारी असणाऱ्या परग्रहांवर सजीवसृष्टी असू शकते आणि मानवापेक्षाही बुद्धिमान प्राणी तेथे असू शकतात, असं सर्वसामान्य लोकांनाच नाही, तर संशोधकांनाही वाटतं. परग्रहवासीयांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी म्हणूनच जगभरात गेल्या कित्येक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन, प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी आजवर अब्जावधी डॉलर्सचा खर्चही करण्यात आला आहे.
परग्रहावर माणूससदृश ‘एलियन्स’ आहेत, यावर अनेकांचा विश्वास आहे. त्यामुळे एखादा विचित्र प्राणी दिसला किंवा आपल्या कल्पनेत असलेल्या एलियन्सप्रमाणे एखादा चेहरा पाहायला मिळाला की लगेच एलियन्सची चर्चा सुरू होते. आताही अशी चर्चा जगभर सुरू झाली आहे, याचं कारणं ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर नुकताच आढळलेला एक विचित्र प्राणी. हा प्राणी म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून तो एलियनच आहे, असं समजून त्याला पाहण्यासाठी शेकडो लोकांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली. या ‘एलियन’चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एलियन पुराण जगभरात पुन्हा नव्यानं सुरू झालं.
या ब्रह्मांडात अब्जावधी आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेतील ताऱ्यांची आणि ग्रहांची संख्या शेकडो अब्ज एवढी प्रचंड आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीखेरीज अन्य कुठल्या ग्रहावर मानवासारखा प्रखर बुद्धी असलेला प्राणी असण्याची क्वचितही शक्यता आहे का, सजीव सृष्टी केवळ आपल्याच ग्रहावर आहे का, याविषयी सगळ्यांच्या मनात अपार उत्सुकता आहे.
एलियन्सविषयीचं हे आकर्षण किती असावं? अमेरिकेतील २६ वर्षांची विनी ओह या तरुणीनं तर आपण एलियन्ससारखंच दिसावं यासाठी गेल्या आठ वर्षांत तब्बल शंभरपेक्षाही अधिक कॉस्मेटिक सर्जरीज स्वत:वर करवून घेतल्या होत्या. याविषयीचा वृत्तांत याच सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. काही वर्षांपूर्वी (आणि आताही) अवकाशात उडत्या तबकड्या फिरत असल्याचा अनुभव काहींनी घेतला होता. या तबकड्या म्हणजे परग्रहावरील सजीवांनी पाठवलेली यंत्रे असल्याचा समजही तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता.
परग्रहावर एलियन्स आहेत की नाहीत याचा शोध घेतानाच तिथे जिवाणू, छोटे सजीव किंवा सजीवसृष्टी आहे की नाही, याचाही शोध संशोधक घेत आहेत. एवढंच नाही, संशोधक गेल्या कित्येक वर्षांपासून परग्रहांवर संदेश पाठवताहेत. तिथे जर मानवासारखा किंवा मानवापेक्षा प्रगत सजीव असेल, तर हे संदेश तो पकडेल आणि प्रत्युत्तर पाठवील, या अपेक्षेत संशोधक अजूनही आहेत; पण ग्रहांमधील प्रचंड अंतर पाहता हे संदेश एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठीही तब्बल साडेआठ वर्षे लागू शकतात, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. म्हणजे परग्रहावरील एखाद्या ‘मित्राला’ आपण नुसतं ‘हाय’ म्हटलं, तरी तो संदेश त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साडेआठ वर्षे लागतील. हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचून त्यानं त्याला उत्तर दिलंच, तर तो संदेश पुन्हा पृथ्वीवर पोहोचण्यासाठीही परत तितकाच वेळ लागू शकतो..
याआधीही सापडले होते ‘एलियन’!
अर्थात असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. ऑस्ट्रेलियात याआधीही अनेक चित्रविचित्र प्राणी सापडले आहेत; जे याआधी कोणीही पाहिले नव्हते. मागच्याच महिन्यात सिडनीच्या उत्तर समुद्रकिनाऱ्यावर असाच एक रहस्यमय प्राणी आढळला होता. ‘एनिमोन’ नावाचा तो एक दुर्मीळ समुद्री जीव असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. क्वीन्सलँड येथील समुद्रकिनाऱ्यावर दोन वर्षांपूर्वीही एक दुर्मीळ प्राणी सापडला होता, तोही ‘एलियन’ असल्याचं लोकांनी छातीठोकपणे सांगितलं होतं; पण संशोधकांनी ते फेटाळून लावलं होतं.
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या ‘एलियन’सदृश प्राण्यामुळे या सगळ्या चर्चेला आणि इतिहासालाही पुन्हा चालना मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियात आता जो प्राणी सापडला आहे, तो समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आला आहे. त्याचे पंजे बऱ्यापैकी मोठे आहेत, त्याला ‘माणसासारखी’ कवटी आणि दात आहेत. अंग अतिशय लवचिक आहे आणि मोठी शेपटी आहे. तो ‘एलियन’च आहे, असा अनेकांचा विश्वास आहे. कारण असा प्राणी आजवर त्यांनी पाहिलेलाच नाही. संशोधकांनी मात्र हा प्राणी म्हणजे एलियन नसून ‘ब्रशटेल पॉसम’ नावाचा समुद्री जलचर असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ‘कॉटन ट्री बीच’ या समुद्रकिनाऱ्यावर हा ‘एलियन’ सापडला. तिथे राहणाऱ्या ॲलेक्स टॅन या व्यक्तीनं सर्वप्रथम या प्राण्याला पाहिलं आणि तो अतिशय आश्चर्यचकित झाला. हा प्राणी ‘एलियन’शी मिळता-जुळता आहे, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यानं ताबडतोब या प्राण्याचे फोटो, व्हिडिओ काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले. सोशल मीडियावर हे फोटो क्षणात व्हायरल झाले आणि या ‘एलियन’ला पाहण्यासाठी लोकांची तिथे झुंबड उडाली.