Jara Hatke: इथे लग्नानंतर मांजर हवेत फेकतात..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:51 AM2023-02-02T05:51:58+5:302023-02-02T05:52:32+5:30
Jara Hatke: जगभरात लग्न करताना विविध प्रथा परंपरा पाळल्या जातात. इंग्लंड, अमेरिकेतही लग्न झाल्यानंतर लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत एक सोहळा असतो. नवरीच्या हातातील फुलांचा गुच्छ आणि नवरीच्या पायाला बांधलेला लोकरीचा तुकडा हवेत फेकण्याचा हा सोहळा ‘टाॅसिंग बकेट’, ‘टाॅसिंग गार्टर’ या नावाने ओळखला जातो.
जगभरात लग्न करताना विविध प्रथा परंपरा पाळल्या जातात. इंग्लंड, अमेरिकेतही लग्न झाल्यानंतर लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत एक सोहळा असतो. नवरीच्या हातातील फुलांचा गुच्छ आणि नवरीच्या पायाला बांधलेला लोकरीचा तुकडा हवेत फेकण्याचा हा सोहळा ‘टाॅसिंग बकेट’, ‘टाॅसिंग गार्टर’ या नावाने ओळखला जातो. लग्न झाल्यावर नवरी पाठमोरी उभी राहाते आणि हात उंचावून आपल्या हातातील फुलांचा गुच्छ मागे फेकते. हा गुच्छ कोणी झेलावा याचाही नियम असतो. नवरीच्या अविवाहित मैत्रिणींनी तो झेलण्यासाठी पुढे यायचं असतं. हा गुच्छ जी कोणी झेलेल तिचं लग्न लवकर होईल अशी यामागे मान्यता आहे. गार्टर पध्दतीत लग्नाचं रिसेप्शन आटोपत आलं की नवरी एका खुर्चीवर बसते. नवरदेवही तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. नवरी आपला ड्रेस गुडघ्यापर्यंत वर करते. मग नवरदेव नवरीच्या पायाला बांधलेली लोकरीची लेस हातानं किंवा दातानं सोडतो आणि ती हवेत फेकतो. ही लेस झेलण्यासाठी नवरदेवाच्या अविवाहित मित्रांनी पुढे यायचं असतं. आता अनेक जण या सोहळ्यातून केवळ आनंद मिळतो, म्हणून शेकडो वर्षांच्या परंपरा पाळतात. पण आपल्याच प्रथा परंपरांकडे डोळसपणे पाहून त्या बदलण्याचा प्रयत्नही जगभरात होत आहे. अमेरिकेतील अशाच प्रयत्नांची ही गोष्ट.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कॅसी राॅथ आणि जोनाथन राॅथ यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर कॅसीने फुलांचा गुच्छ हवेत न उडवता, हातातलं मांजर हवेत फेकलं. अर्थात, हे मांजर खरेखुरे नसून मखमलीचे होते. क्रिस्टिना सोटो नावाच्या तिच्या मैत्रिणीने पुढे येऊन ते झेललं. तिने कॅसी आणि जोनाथनला टाम्पा बे येथील ‘ह्युमन सोसायटी’ (निराधार प्राण्यांना सांभाळणारी संस्था) येथे जाऊन एका मांजरीला दत्तक घेण्याचं वचन दिलं. कॅसी आणि जोनाथनच्या रिसेप्शनमधील ‘काॅकटेल अवर’मध्ये रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांना मांजरीच्या ५ अनाथ पिल्लांना भेटण्याची संधी मिळाली. त्यातील दोन पिल्लांना त्यांचं हक्काचं घर मिळालं.
कॅसी आणि जोनाथन दोघेही शाळेपासूनचे मित्र. आपल्या लग्नात निमंत्रित पाहुण्यांसोबत आपली मांजरं तर असतीलच, पण सोबत गरजू प्राणीही असतील असं त्यांनी खूप पूर्वीपासूनच ठरवलेलं. लग्नात बाष्कळ खर्च करण्यापेक्षा काही उपायुक्त गोष्टी कराव्यात अशी त्यांची इच्छा होती. त्यांचं हे स्वप्न आणि इच्छा पूर्ण झाली ती नोव्हा आणि कारसिन्सिकी या दोन मैत्रिणींमुळे. नोव्हा आणि कारसिन्सिकी यांनी कॅसीचा हवेत मांजर फेकण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकला. हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो लाइक केला. मांजरांना दत्तक देण्याची ही नवीन प्रथाही लोकांना खूप आवडली.
नोव्हा आणि कारसिन्सिकी या दोघी मैत्रिणी लहानपणापासून निराश्रित प्राण्यांची सेवा करतात. या प्राणी प्रेमातूनच दोघींनी मिळून एक आगळंवेगळं काम सुरू केलं. सुरुवातीला या दोघी टाम्पा हाॅटेलमध्ये लग्न सोहळा आयोजित करायला मदत करायच्या. लग्नात आलेल्या प्राण्यांकडे लक्ष द्यायच्या. त्यांना सांभाळायच्या. त्यांचं हे काम बघून अनेकांनी आपल्या लग्नात आपल्या लाडक्या प्राण्यांना घेऊन येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच नोव्हा आणि कारसिन्सिकी यांनी २०१५ मध्ये ‘फेअरीटेल पेट केअर’ सुरू केलं. या सेंटरद्वारे ज्यांना आपल्या लग्नात आपल्या पाळीव प्राण्यांना सहभागी करून घ्यायचं आहे, त्यांना या सेंटरद्वारे मदत केली जाते. २०१५ पासून आतापर्यंत नोव्हा आणि कारसिन्सिकी यांनी ११०० कुत्र्यांना छान काॅलरचे कपडे आणि टाय घालून तयार केलं आहे. कुत्र्यांच्या तुलनेत तशी संधी केवळ ८ मांजरांना मिळाली आहे. लग्नसोहळ्यात नवरा-नवरीच्या पाळीव प्राण्यांची देखभाल करताना, त्यांनाही प्राण्यांसह आपला लग्नसोहळा अनुभवण्याचा आनंद देताना नोव्हा आणि कारसिन्सिकीला आणखी एक भन्नाट कल्पना सुचली. या लग्नसोहळ्यात निराधार प्राण्यांनाही घेऊन यायचं आणि त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा! यासाठी त्यांनी ‘यॅपिली एव्हर आफ्टर’ ही प्राण्यांना दत्तक देण्याची नवीन सेवा आपल्या सेंटरमार्फत सुरू केली. पाहुण्यांना इच्छा झाली तर ते हे प्राणी दत्तक घेतात.
लग्न सोहळ्यात प्राणी!
लग्न सोहळ्यासारख्या गडबडीच्या प्रसंगात प्राण्यांकडे लक्ष देणं ही केवळ अशक्य गोष्ट. पण टाम्पा येथील फेअरी टेल पेट केअर सेंटरने ही अवघड गोष्ट सोपी केली आहे. लग्नसोहळ्यात प्राण्यांना तयार करणं, त्यांना लग्नाच्या स्थळी घेऊन येणं, पाहुण्यांशी त्यांची भेट घालून देणं, फोटो काढणं, त्यांच्याशी खेळणं यासाठी माणसं नेमलेली असतात. त्यामुळे हे प्राणी खूप माणसं पाहून गोंधळत नाही, चिडत नाही की घाबरतही नाहीत. उलट या प्राण्यांचं यानिमित्तानं सामाजिकीकरण होतं.