Jara Hatke: मी ६६ केसेस लढलो..... लग्न लावून द्या, नाहीतर.....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 01:10 PM2023-07-01T13:10:28+5:302023-07-01T13:10:47+5:30
Jara Hatke News: सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हरयाणाच्या रेवाडीमधील या वृद्धाने अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला.
सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हरयाणाच्या रेवाडीमधील या वृद्धाने अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. डोक्यावर लग्नाचा फेटा बांधून हा वृद्ध जिल्हा सचिवालयात पोहोचला. माझे कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र द्या नाहीतर लग्न लावून द्या, अशी अजब मागणी त्याने संबंधित अधिकाऱ्याकडे केली. ही वृद्ध व्यक्ती एकटी राहत असल्याने त्यांचे कुटुंब प्रमाणपत्र देता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या सतबीर यांनी फेटा बांधून रेवाडीतील जिल्हा सचिवालय कार्यालयात धाव घेतली.
माझा मुलगा दिल्लीत राहतो आणि पत्नीचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. गावातील पडक्या घरात मी राहतो. असे असतानाही मला कुटुंब प्रमाणपत्र दिले जात नाही. यामुळे मला वृद्धापकाळातील पेन्शन योजनेचा फायदा घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुढे ते संतापून म्हणाले की, सरकारने गरजूंना वेळीच मदत पोहोचवली पाहिजे. मी सरकारविरुद्ध ६६ खटले लढले आहेत. सरकारने सर्वांना समान दर्जाची वागणूक दिली पाहिजे. त्यामुळे जर प्रमाणपत्र नसेल द्यायचे तर माझे लग्न लावून द्या अशी अजब मागणी त्यांनी यावेळी केली. यामुळे अधिकारी काही काळ गोंधळलेले होते.