Jara Hatke: फुटबॉल सामना खेळण्यासाठी भावासोबत लावून दिलं होणाऱ्या पत्नीचं लग्न, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 05:54 PM2022-08-14T17:54:05+5:302022-08-14T17:54:39+5:30
Jara Hatke: एक अजब प्रकार समोर आला आहे. एका फुटबॉलपटू स्वत:च्या लग्नामध्ये अनुपस्थित राहिला. मात्र आपल्या अनुपस्थितीत लग्न थांबू नये म्हणून, त्याने अजब क्लुप्ती लढवली.
स्टॉकहोम - आजच्या धकाधकीच्या काळात अनेकजण आपल्या जीवनात एवढे व्यस्त झाले आहे की, आवश्यक कामांसाठी वेळ काढावा लागतो. एकेकाळी लग्नसमारंभ असला की, लोक नातेवाईकांकडे आठवडाभर राहायला जायचे. मात्र आजकाल स्वत:च्या लग्नासाठीही एवढा वेळ काढणं लोकांसाठी कठीण झालं आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका फुटबॉलपटू स्वत:च्या लग्नामध्ये अनुपस्थित राहिला. मात्र आपल्या अनुपस्थितीत लग्न थांबू नये म्हणून, त्याने अजब क्लुप्ती लढवली.
ही गोष्ट आहे स्वीडिश फुटबॉल क्लबमधील खेळाडू मोहम्मद बाया तुरे याची. त्याने एका फुटबॉल सामन्यासाठी स्वत:चा विवाह टाळला. त्यापेक्षा जबरदस्त ती आयडिया होती, जी त्याने या परिस्थितीपासून वाचण्यासाठी वापरली होती. आता हे लग्न आणि फुटबॉलपटूचं डेडिकेशन या दोघांचीही चर्चा सुरू आहे.
२६ वर्षीय मोहम्मद बाया तुरे याने हल्लीच स्वीडिश क्लब जॉईन केला होता. २२ जुलै रोजी झालेल्या डिलनंतर क्लबकडून त्याला महत्त्वपूर्ण सामन्यासाठी त्वरित येण्यास सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी मोहम्मद बाया याचा विवाह निश्चित झाला होता. लग्नही महत्त्वाचे आणि सामनाही महत्त्वाचा अशा द्विधा मनस्थितीत मोहम्मद बाया सापडला. लग्न टाळता येणार नाही आणि महत्त्वपूर्ण सामना सोडून करिअरशी तडजोड करणेही शक्य नव्हते. अशा परिस्थिती त्याने स्वत:च्या अनुपस्थितीत स्वत:चा विवाह करवून घेतला.
सियरा लियोनमध्ये २१ जुलै रोजी त्याचं लग्न होतं. स्वीडिश वृत्तपत्र Aftonbladet शी बोलताना या फुटबॉलपटूने सांगितले की, लग्नाचं फोटोशूट त्याने आधीच केलं होतं. मात्र खऱ्या लग्नात त्याच्या जागी विवाहाचे सर्व विधी त्याच्या भावाने केले. याबाबतचे काही फोटोसुद्धा समोर आले आहेत. त्यामध्ये त्याची पत्नी त्याच्या भावासोबत विवाहातील रीतीरिवाज करताना दिसत आहेत. मात्र स्वत: मोहम्मद मात्र तिथे उपस्थित नाही आहे. मात्र आता तो त्याच्या पत्नीसोबत स्वीडनमध्ये शिफ्ट होणार आहे.