ऐकावं ते नवल! घणसोलीत सापडला बोलका कावळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:57 PM2018-11-16T13:57:36+5:302018-11-16T13:59:32+5:30
पोपट,कुत्रा,मांजर आणि कबुतरे पाळण्याची अनेकांना आवड असल्याचे आपण ऐकले आहे. पण प्रत्यक्षात सर्व पक्ष्यांमध्ये चपळ आणि चतुर असलेला कावळा घरात पाळल्याचे कुठेही ऐकिवात नाही.
- अनंत पाटील
नवी मुंबई - पोपट,कुत्रा,मांजर आणि कबुतरे पाळण्याची अनेकांना आवड असल्याचे आपण ऐकले आहे. पण प्रत्यक्षात सर्व पक्ष्यांमध्ये चपळ आणि चतुर असलेला कावळा घरात पाळल्याचे कुठेही ऐकिवात नाही. इतकेच नव्हे तर तो कावळा या पक्षीमित्राशी आणि त्याच्या कुटुंबाशी प्रत्यक्षात बोलणारा असा आहे. गेल्या चार वर्षापासून स्वताच्या घरी कावळा हा पक्षी पाळणा-या पक्षी मित्राचे नाव दिलीप दिनकर म्हात्रे असे असून तो नवी मुंबईतील घणसोली गावात राहत आहे. या बोलक्या कावळ्याबरोबरच त्याने घार आणि पोपट सुद्धा पाळलेला आहे. अशा या पक्षीप्रेमी दिलीप म्हात्रे यांच्या घरी जावून घेतलेली ही माहिती.
ज्ञानेश्वर माउलींची "पैल तो गे काऊ कोक ताहे,शकून गे माये सांगताहे" या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तोंडून ऐकताना त्याचे देहभान हरपते.पितृपक्षात कावळय़ांना अग्रमान देण्याची कथा पुराणात आढळून येते. कावळय़ाचा संदर्भ पितरांशी जोडला गेल्याने ते अमर आहेत. तसेच पितरांपर्यंत पोहचण्यासाठीचे कावळेसुद्धा अमर आहेत असे मानले गेले. वस्तुतः कावळय़ाचे सर्वसामान्य आयुर्मान १४ ते१५ वर्षे आहे.लोकांच्या कावळ्याप्रती विविध समजूत आहेत त्यातून आपण लहानपणापासून ऐकले असेल की दारात कावळा ओरडला की पाहुणे येतात. किंवा काही लोकांप्रमाणे तर कावळा घराच्या आसपास असल्यास शोकसमाचार असल्याचीही समजूत आहे. अनेक लोकं यावर विश्वास करतात तर अनेक याला अंधविश्वास असल्याचं म्हणतात.
दिलीप म्हात्रे या तरुणाला चार वर्षापूर्वी कावळ्याचे एक लहानसे पिल्लू घणसोली खाडीकिनारी असलेल्या साईबाबा मंदिर जवळ जखमी अवस्थेत सापडला. त्याला पकडायला गेल्यानंतर सर्व कावळे एकत्रित काव काव करून जोरजोरात आरोळ्या मारू लागल्याने काही करून त्या पिल्लाचा जीव वाचवून त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु दोन महिन्यातच त्याच्यावर उपचार करून बरा झाला. सहा महिन्यानंतर पंखांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला घराबाहेर सोडले असता तो परत घरीच येऊ लागल्याने अखेर कावळा पाळण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजमितीस चार वर्षाचा कालावधी उलटूनही कावळा घरातच त्यांच्या कुटुंबासोबत राहतोय. या कावळ्याचे नाव आहे "राजा " पोपटाचे नाव "राणी" आणि घारी चे नाव "अवतार" अशी ठेवली आहेत. त्यांच्या नावाने हाक मारल्यावर हे तिन्ही पक्षी त्यांच्या हाकेला साद देतात. आता तर दिलीप म्हात्रे यांची पत्नी गीता आणि १० वर्षाची त्यांची मुलगी तेजस्वी यांच्याशी तर हा कावळा बाय,टकल्या,राजा असे बोलतो.
दिलीप कावळ्यांचा स्पष्ट आवाज काढून दररोज गावातील खाडीकिनारी शेकडो कावळे बोलावतो. नवी मुंबई महापालिकेत घणसोली विभागात कंत्राटी सफाई कामगार म्हणून दिलीप म्हात्रे तुटपुंज्या पगाराची नोकरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. कावळ्याबरोबर त्याने चार घारींची पिल्ले आणि एक घुबड पक्षी पाळली होती.पण तीन घारी पंखांची वाढ झाल्यानंतर उडून गेल्या. आता फक्त एकच घार घरी असून ती पण दिलीप च्या परिवारात मिसळून गेलेली आहे. आता हा कावळा ,घार आणि पोपट दिलीप च्या घरात १० वर्षाच्या मुलीसोबत मनसोक्त रमले आहेत.
विषारी आणि बिनविषारी साप पकडून जंगलात सोडून देण्यात तो पटाईत आहे. उन्हाळ्यात पशु पक्ष्यांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागते त्या कालावधीत हा घराच्या गच्चीवर पाण्याचे भरलेले डबे ठेवतो. रेशनीग दुकानात पडलेले धान्य गोळा करून कबुतरांना खायला घालणे त्याची रोजची सवय आहे. म्हणून तो म्हणतो कि जीवनावर जमेल तितके प्रेम करायला शिका, माणसांप्रमाणे पशु पक्षी आणि मुक्या जनावरांवर प्रेम करण्याचा त्याने संदेश दिला आहे.
व्हिडिओ - संदेश रेणोसे