Jara hatke: हनिमूनला गेले असताना आई-वडिलांनी केलं असं काही, हॉटेल सोडून पळालं नवविवाहित जोडपं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:40 PM2022-05-16T16:40:54+5:302022-05-16T16:42:04+5:30
Honeymoon, Jara Hatke: लग्नानंतर काही काळ एकमेकांसोबत एकट्याने व्यतित करावा, अशी प्रत्येक नवविवाहित जोडप्याची इच्छा असते. मात्र एका नवविवाहित जोडप्याला लग्नात हनिमून ट्रिपचं गिफ्ट घेणं चांगलंच महागात पडलं
लंडन - लग्नानंतर काही काळ एकमेकांसोबत एकट्याने व्यतित करावा, अशी प्रत्येक नवविवाहित जोडप्याची इच्छा असते. त्यासाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी जावं, कुटुंबीयांपासून दूर राहून पर्सनल लाईफ एंजॉय करावी, असं वाटत असतं. मात्र एका नवविवाहित जोडप्याला लग्नात हनिमून ट्रिपचं गिफ्ट घेणं चांगलंच महागात पडलं. आता या जोडप्यानं त्यांचा अनुभव Reddit वर शेअर केला आहे. या जोडप्याच्या हनिमूनमध्ये त्यांचे आई-वडीलच त्यांच्या अ़डचणीचे कारण ठरले.
त्याचं झालं असं की, लग्नाच्या वेळी नवविवाहित जोडप्याला एक आठवड्याचं हनिमून पॅकेज आई-वडिलांनी गिफ्ट केलं होतं. त्यामुळे हे जोडपं खूप खूश होतं. मात्र या पॅकेजमध्ये एक अटही होती. ती म्हणजे या जोडप्यासोबत मुलग्याचे आई-वडीलही ग्रुप ट्रॅव्हल करतील. या अटीसोबतच हे जोडपं हनिमूनला गेलं. मात्र काही दिवसांतच जोडप्यावर आई वडिलांना सोडून हॉटेलमधून कुठेतरी पळण्याची वेळ आली.
हनिमूनदरम्यान, जोडप्याला प्रायव्हसी मिळत नव्हती. प्रत्येकवेळी पालक त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे जोडपं खूप त्रस्त झालं. हनिमून दरम्यान मुलग्याचे आई-वडील रोज सकाळी ६ वाजल्यापासूनच जोडप्याला दरवाजा खटखटावून उठवायचे. त्यानंतर सर्वजण एकत्रच ब्रेकफास्ट, लंच, डिनर करायचे. वैतागून या जोडप्याने अनेकदा आपल्या आई-वडिलांकडे स्वतंत्रपणे वेळ घालवू देण्याची मागणी केली. मात्र त्याला तुम्ही तो वेळ हॉटेलमध्येच घालवा, असं मिळालं.
अखेर एकदा या मुलाने आई-वडिलांकडे याबाबत स्पष्टपणे सांगितलं. मात्र त्यावर आम्हीच तुमच्या हनिमूनला स्पॉन्सर केलं, असं उत्तर त्याला मिळालं. त्यानंतर वैतागलेल्या या जोडप्याने आई-वडील राहत असलेले हॉटेल सोडून दुसरीकडे कुठेतरी पळण्याची योजना आखली आणि त्यात ते यशस्वीही झाले.