Jara hatke: अजबच! इथे एक नोकरी मिळताना मुश्किल, २३व्या वर्षांपर्यंत तिनं केल्या २३ नोकऱ्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 06:18 AM2022-06-23T06:18:36+5:302022-06-23T06:19:01+5:30
Jara hatke: जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. अनेक तरुण हातांना काम नाही, मात्र, लंडनमधील एक तरुणी अशी आहे, जिच्या पायाशी मात्र नोकऱ्या अक्षरश: लोळण घेत आहेत.
जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. अनेक तरुण हातांना काम नाही, त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. कोरोनाकाळानं तर यात आणखीच भर घातली आणि ज्यांच्या हाती नोकरी होती, थोडाफार रोजगार होता, त्यांनाही घरी रिकामं बसण्याची वेळ आली. अर्थव्यवस्था आता रुळावर येत असण्याची चिन्हे दिसत असतानाही त्यात फारसा फरक पडलेला नाही. मात्र, लंडनमधील एक तरुणी अशी आहे, जिच्या पायाशी मात्र नोकऱ्या अक्षरश: लोळण घेत आहेत. अर्थात त्यामागे तिचं स्वत:चं कर्तृत्वही आहे. २३ वर्षीय या तरुणीचं नाव आहे ॲनास्तासिया सेसेटो आणि वयाची २३ वर्षे पूर्ण होण्याआधीच तब्बल २३ नोकऱ्या तिला मिळाल्या आहेत. कुठल्याही कामात कमीपणा न मानण्याची आणि त्या प्रत्येक कामातून काहीतरी शिकण्याची वृत्ती अंगी असल्यामुळेच ॲनास्तासियाला आतापर्यंत इतक्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. आजवर कुठल्या कठल्या नोकऱ्या तिनं कराव्यात? वयाच्या सोळाव्या वर्षापासून वेगवेगळ्या नोकऱ्या करायला तिनं सुरुवात केली. अगदी हॉटेलमध्ये वेटरपासून ते सुपर मार्केट कॅशियर, बेकरीमध्ये कामगार, बेबीसिटर, आइस्क्रीम विक्रेता, सेल्स वर्कर, डिशवॉशर, पियानो टिचर, मार्केट सेलर.. अशा अनेक नोकऱ्या तिनं केल्या आहेत. इतकंच काय, मॉडेल, ॲक्टर, एन्फ्लुएन्सर म्हणूनही तिनं आपलं नशीब अजमावलं. या सगळ्या अनुभवांतून शहाणी होत, ज्ञान मिळवत तिनं आता स्वत:ची कंपनी सुरू केली आहे आणि त्या कंपनीची ती मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
ॲनास्तासिया म्हणते, मी इतक्या नोकऱ्या केल्या म्हणजे, या सगळ्या कामांत मी परफेक्ट होते, ही सगळी कामं मी उत्तम करीत होते, असं नाही. माझ्यात अनेक कमतरता होत्या, आहेत; पण त्या प्रत्येक कामातून मी काहीतरी शिकत गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी इतक्या नोकऱ्या केल्या; पण कोणत्याही नोकरीतून माझी हकालपट्टी करण्यात आली नाही, मला काढून टाकण्यात आलं नाही. अर्थात तशी वेळ नक्कीच आली असती; पण त्याआधीच दुसरी चांगली संधी मिळाल्यानं माझ्यावर ती वेळ आली नाही..
ॲनास्तासियानं बेकरीमध्ये कामगार म्हणून पहिल्यांदा काम सुरू केलं. अतिशय अवघड असं हे काम होतं. मोठ्या फ्रिजरमध्ये तासनतास तिला उभं राहावं लागायचं, वेटर आणि डिशवॉशरचं कामही अतिशय कठीण होतं. शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी लागायची; पण ॲनास्तासियानं हिंमत सोडली नाही. प्रत्येक काम तिनं जिद्दीनं केलं आणि त्यातील बारकावे समजून घेतले. ॲनास्तासिया म्हणते, अगदी चतुर्थ श्रेणी कामगारांची कामंही मी केली, म्हणूनच आज मला ते काम करणाऱ्या साऱ्याच लोकांविषयी, कामगारांविषयी खूप आदर आहे. ही कामं स्वत: करून पाहिल्याशिवाय त्यांच्या कष्टाची कल्पना आपल्याला करता येणार नाही. या सगळ्या कामांतून एक महत्त्वाची गोष्ट मी शिकले ते म्हणजे शिस्त. हीच शिस्त मला आज उपयोगी पडते आहे.
ज्या ज्या ठिकाणी ॲनास्तासियानं काम केलं, तिथले बॉस, मालक यांनीही मान्य केलं की, ॲनास्तासिया भले आपल्या कामात परफेक्ट नसेल; पण तिची शिकण्याची जिद्द खूप मोठी होती. सांगितलेलं, तिला येत नसलेलं काम शिकण्याचा तिचा झपाटा मोठा होता.
अनेक नोकऱ्या केल्यानंतर ॲनास्तासिया कंटेंट रायटर, सोशल मीडिया मॅनेजर, ऑनलाइन पर्सनल ट्रेनर झाली.. हे सारे उद्योग तिला आवडतही होते; पण तरीही थोड्याच दिवसांत तिनं हे काम सोडलं, कारण तिला आणखी उंच शिडीवर जायचं होतं. त्यानंतर तिनं एका पंचतारांकित हॉटेलमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम स्वीकारलं. तिच्या दृष्टीनं हा जॉबही ‘ग्रेट’ होता; पण पुन्हा तेच. तिचं म्हणणं, हा जॉबही माझ्यासाठी नव्हताच. मला आणखी काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे हा जॉबही तिनं सोडला. तिला स्वत:ला आता कोणताही बॉस नको होता की कोणी आपल्याला ऑर्डर सोडावी, असं वाटत नव्हतं. त्यामुळे ‘एस इन्फ्लूएन्सर्स’ नावाची नवी कंपनी तिनं स्थापन केली..
तरुणांना देणार नोकरीच्या टिप्स!
वयाच्या २३ वर्षांच्या आधीच किमान २३ नोकऱ्या करून ॲनास्तासिया स्वत:च आता आपल्या कंपनीची ‘मालक’ झाली आहे. इंग्रजी, रशियन, डच आणि इटालयिन अशा चार भाषांवर ॲनास्तासियाचं प्रभुत्व आहे. असंख्य तरुणांना नोकरी नसल्यानं नैराश्य येतं. ‘नोकरी कशी मिळवायची?’ यासाठीचं प्रशिक्षण, टिप्स आता ती या तरुणांना देणार आहे.