Jara Hatke: दोन बायका फजिती ऐका! पोलिसांसमोरच केली पतीची वाटणी, असं झालं वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:07 PM2022-03-26T12:07:56+5:302022-03-26T12:08:58+5:30
Jara Hatke News: तुम्ही मालमत्ता, जमीन, घर इत्यादींची वाटणी झाल्याचे ऐकले असेल. तुमच्याही कुटुंबात तशी वाटणी झाली असेल. मात्र तुम्ही कधी पतीच्या वाटणीबाबत ऐकले आहे का? हो पतीची वाटणी. बिहारमध्ये दोन बायकांचा दादला असलेल्या पतीचे दोन्ही पत्नींमध्ये पोलिसांसमक्ष वाटप करण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे.
पाटणा - तुम्ही मालमत्ता, जमीन, घर इत्यादींची वाटणी झाल्याचे ऐकले असेल. तुमच्याही कुटुंबात तशी वाटणी झाली असेल. मात्र तुम्ही कधी पतीच्या वाटणीबाबत ऐकले आहे का? हो पतीची वाटणी. बिहारमध्ये दोन बायकांचा दादला असलेल्या पतीचे दोन्ही पत्नींमध्ये पोलिसांसमक्ष वाटप करण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. पुर्णिया येथील पोलीस सल्लागार केंद्राने ही वाटणी केली. त्यानुसार पती १५ दिवस पहिल्या पत्नीकडे आणि पुढचे १५ दिवस दुसऱ्या पत्नीकडे राहील.
पोलिसांच्या कौटुंबिक सल्लागार केंद्राने दिलेल्या निर्णयाची सगळीकडे चर्चा सुरू आहेत. आतापर्यंत केवळ सिनेमा आणि मालिकांमध्येच अशा प्रकारच्या गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या. मात्र आता ही खरी घटना समोर आल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे. भवानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडियारी येथील एका महिलेने तिच्या पतीवर तो आधीपासून विवाहित असल्याचा आणि तो सहा मुलांचा बाप असल्याचा आरोप केला होता. तसेच त्याने आपल्याला फसवून दुसरा विवाह केल्याचाही आरोप केला. मात्र आता तो आपल्याला सोबत ठेवू इच्छित नाही, असाही तिने आरोप केला.
दरम्यान, या महिलेच्या आरोपानंतर पोलिसांच्या कौटुंबिक सल्लागार केंद्रातील अधिकारीही काही काळ संभ्रमात पडले. सगळ्यांचे दावे प्रतिदावे ऐकल्यानंतर अधिकाऱ्यांनी सदर पतीने दोन्ही पत्नींचा सांभाळ करावा, असा निर्णय दिला. तसेच त्यांचे पालन पोषणही करावे, असे सांगितले. दोन्ही पत्नींच्या राहण्याची व्यवस्था दोन वेगवेगळ्या घरात करावी. तसेच १५ दिवस पहिल्या पत्नीसोबत तर १५ दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहावे, असे वाटप करून दिले. हा निर्णय पती आणि त्याच्या दोन्ही पत्नींना मान्य झाला. तसेच ते आनंदाने घरी गेले.
पोलीस कौटुंबिक सल्लागार केंद्राच्या संयोजिका किरण बाला, सदस्य दिलीप कुमार दिपक, स्वाती, रवींद्र शाह, बबिता चौधरी, जीनत रहमान, आणि प्रमोद जायसवाल यांनी खूप सल्लामसलत आणि दोन्ही पत्नी व पतीच्या सहमतीनंतर हा निर्णय दिला. तसेच पुढे या करारातून मागे फिरू नये म्हणून यासंदर्भात या तिघांकडून एक बाँडही लिहून घेण्यात आला.