Jara Hatke: ५ दोस्तांच्या ५० वर्षांच्या दोस्तीची कहाणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 09:53 AM2022-06-24T09:53:28+5:302022-06-24T09:54:32+5:30

Jara Hatke: लहानपणाची दोस्ती काय सांगावी? सगळी सुख-दु:खं, चांगले-वाईट अनुभव एकत्र घेतल्यानंतर ही दोस्ती मुरत जाते आणि नंतर त्या दोस्तीच्या कहाण्या लोकांसाठीही नवलाईच्या ठरतात. शाळकरी वयात झालेली ही दोस्ती नंतरच्या काळात आणखी घट्ट होत जाते.

Jara Hatke: The story of 50 years of friendship of 5 friends! | Jara Hatke: ५ दोस्तांच्या ५० वर्षांच्या दोस्तीची कहाणी !

Jara Hatke: ५ दोस्तांच्या ५० वर्षांच्या दोस्तीची कहाणी !

googlenewsNext

लहानपणाची दोस्ती काय सांगावी? सगळी सुख-दु:खं, चांगले-वाईट अनुभव एकत्र घेतल्यानंतर ही दोस्ती मुरत जाते आणि नंतर त्या दोस्तीच्या कहाण्या लोकांसाठीही नवलाईच्या ठरतात. शाळकरी वयात झालेली ही दोस्ती नंतरच्या काळात आणखी घट्ट होत जाते. विशेष म्हणजे बऱ्याचदा उच्च शिक्षण, नोकरी, कामधंदा यानिमित्तानं त्यांच्या वाटा वेगळ्या होतात, भेटणं दुर्मिळ होतं, पण त्या दोस्तीची याद प्रत्येकाच्या मनात ताजी असते. कधीमधी भेट होते, अधूनमधून फोनवर गप्पा होतात, पण या गप्पा अशा काही रंगतात की, मध्ये इतक्या वर्षांचा गॅप होता हेदेखील कोणाला कळू नये! अनोख्या दोस्तीचा हा याराना अनेकांसाठी अमूल्य ठेवा असतो. अशाच एका अनोख्या दोस्तीची कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे. ही कहाणी आहे अमेरिकेतील पाच जिगरी दोस्तांची. शाळकरी वयात झालेली त्यांची दोस्ती आजही टिकून आहे. पण या दोस्तीची कहाणी इथेच संपत नाही. त्यांच्या दोस्तीला किमान पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे आणि त्यातला चाळीस वर्षांचा इतिहास तर फोटोबद्धही झाला आहे. 

जॉन डिक्सन, जॉन मोलोनी, मार्क रुमर, जॉन वर्डलॉ आणि डॅलस बर्नी हे अमेरिकेतील पाच शाळकरी दोस्त. १९७० च्या सुमारास हे सगळे जण शाळासोबती होते. अनेक सुख-दु:खांत त्यांनी एकमेकांची सोबत केली होती. त्या काळापासून त्यांची दोस्ती. त्यांनी एक अनाेखा नियम केला होता... पुढच्या आयुष्यात काहीही होऊ दे, शिक्षण, नोकरी-धंद्यानिमित्त कोणी कुठेही जाऊ दे, पण आपल्या दोस्तीचा सुगंध कायम टिकला पाहिजे. वर्षातला किमान एक तरी दिवस आपण एका ठिकाणी सर्व मित्रांसह भेटलंच पाहिजे. गेली चाळीस वर्षे त्यांनी हा नियम टिकवला आहे. 

कॅलिफोर्नियाच्या सीमेवर कोप्को लेक नावाची एक जागा आहे. इथे असलेल्या एका केबिनमध्ये ते एकत्र भेटतात. त्या भेटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच ठिकाणी बसून १९८२ मध्ये त्यांनी आपला एक एकत्र फोटो काढला होता. प्रत्येकानं आपापली एक पोज घेतली होती. या घटनेला आता चाळीस वर्षे उलटून गेली, तरीही शाळकरी, टिनेज वयात हे पाचहीजण ज्या क्रमानं तिथे बसले होते, फोटोसाठी जी पोज त्यांनी घेतली होती, त्याच क्रमानं ते आजही तिथे बसतात आणि तीच पोज घेतात. आज २०२२ मध्येही हा सिलसिला अजूनही कायम आहे. या सिरीजमधला आपला नववा फोटो नुकताच त्यांनी शेअर केला आहे. मध्ये एक दुदैवाची गोष्ट घडली. त्यामुळे मधल्या फोटोची आणि पाचही दोस्तांच्या मधल्या क्रमांकावर असणाऱ्या दोस्ताची जागा रिकामी राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण या पाचही जिगरी दोस्तांमधील एक जॉन डिक्सन यांना कॅन्सर झाला. त्यांचं मोठं ऑपरेशनही झालं. अक्षरश: जीवन-मरणाची लढाई त्यांनी लढली, पण अखेर मृत्यूवर त्यांनी विजय मिळवला. नुकत्याच झालेल्या या भेटीत तेही आपल्या नेहमीच्या पोजमध्ये उपस्थित होते. सगळ्यांसाठीच हा भावनिक विषय होता.

जॉन डिक्सन हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचं म्हणणं आहे, खरंच, आयुष्याची एक खूप मोठी लढाई मी लढलो. सध्या तरी आमच्या दोस्तीनं सगळ्याच संकटांवर मात केली आहे. आमच्या दोस्तीला अजून यमराजही हात लावू शकलेला नाही. 

या पाचही दोस्तांमधील केवळ जॉन डिक्सन हेच आता सांता बार्बरा येथे राहतात. जॉन मोलोनी एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. ते न्यू ऑरलिन्स येथे राहतात. मार्क रुमर आणि जॉन वर्डलॉ हे दोघेही ओरेगन येथे राहतात, तर डॅलस बर्नी हेदेखील शिक्षक असून, ते कॅलिफोर्निया येथे राहतात. 
हे पाचही दोस्त इतकी वर्षें एका अनामिक ओढीनं एकमेकांच्या जवळ येत होते. २०१७ मध्ये ‘सीएनएन’नं या अनोख्या दोस्तीची कहाणी सर्वांत पहिल्यांदा जगापुढे ठेवली आणि जगभरातल्या तमाम दोस्तांच्या आठवणी ताज्या केल्या.

फिर मिलेंगे, ये वादा है हमारा !
या पाचही दोस्तांच्या भेटीची अजून एक अजीब दास्ताँ आहे. ज्याप्रमाणे ते एका ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात, एकाच पोजमध्ये फोटो काढतात, त्याचप्रमाणे त्याच केबिनमध्ये ते जेवण आणि नंतर फिशिंगही करतात... आपल्या आयुष्याची कहाणी एकमेकांशी शेअर करतात, जुन्या आठवणींत रमतात आणि पुन्हा एकदा याच दिवशी भेटण्याचा वादा करत एकमेकांचा निरोप घेतात.

Web Title: Jara Hatke: The story of 50 years of friendship of 5 friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.