अरे देवा! 12 वर्षांपासून अन्न नाही तर दगड खाऊन जगतोय 'हा' व्यक्ती; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:29 PM2022-03-28T12:29:39+5:302022-03-28T12:32:20+5:30
गेल्या 12 वर्षांपासून तो सतत हे दगड खात असल्याचा संतोषचा दावा आहे.
नवी दिल्ली - छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या संतोष लकरा या व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संतोष लकराने असा दावा केला आहे की तो देवाची प्रार्थना करून लोकांचे आजार, दुःख आणि वेदना संपवतो. संतोष ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतो आणि त्याने आपल्या घरात प्रभू येशूच्या अनेक मूर्ती आणि फोटो आहेत. या खोलीत बसून प्रार्थनेद्वारे लोकांच्या समस्या दूर केल्याचा संतोषचा दावा आहे. संतोषने आतापर्यंत शारीरिक आणि इतर समस्यांनी त्रस्त असलेल्या अनेकांच्या समस्या दूर केल्याचा दावा केला आहे.
संतोष प्रार्थना करताना गुडघ्यावर बसतो आणि दोन्ही गुडघ्याखाली खडबडीत दगड ठेवून देवाची पूजा करतो. प्रार्थनेनंतर, संतोष लोकांचं दु:ख आणि वेदना आत्मसात करण्याचा दावा करतो. त्यासाठी संतोष तोंडात दगडाचे तुकडे ठेवतो आणि गिळून पोटात पोहोचवतो. या कलेमागे दैवी शक्ती असल्याचं संतोषचं म्हणणं आहे. दगड खाल्ल्याने त्याला त्रासही होत नाही. दगड खाल्ल्यानंतर त्याला अन्न खाण्याची गरज नाही. या दगडांनी त्याचं पोट भरतं आणि हे खडे त्याला सहज पचतात, असा त्याचा दावा आहे.
गेल्या 12 वर्षांपासून तो सतत हे दगड खात असल्याचा संतोषचा दावा आहे. संतोष कुमार याच्या दगड खाण्याच्या कलेने स्थानिक लोक आणि त्याचे कुटुंबीयही आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणालाही असं दगड खाताना पाहिलं नसल्याची त्यांची धारणा आहे. दगड खाताना कधी काही घटना घडू नये, अशी भीती घरच्यांना वाटत होती, पण आता त्यांनाही त्याची सवय झाली आहे. संतोषची पत्नी अलिशा सांगतात की, आतापर्यंत त्याने हजारो दगड खाल्लेले आहेत. संतोषला दगड खाऊन कधीही त्रास झाला नाही आणि आजपर्यंत त्याला कधी डॉक्टरकडेही घेऊन जावं लागलं नाही.
निवृत्त सीएमएचओ डॉक्टर सीडी बखाला यांनी माणसाने दगड खाल्ल्याची घटना ऐकून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणतात की हे जीवघेणं असू शकतं. या प्रकरणातील दाव्याची चौकशी झाली पाहिजे. प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा, असं काहींचं म्हणणं आहे. कारण त्याचे अनुसरण इतर लोक करू शकतात आणि त्यामुळं त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. हा अंधश्रद्धेचा विषय असू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.