27 वर्षीय मुलीने भगवान शंकराशी केलं लग्न; पत्रिका छापल्या, वरातही आली, थाटात पार पडला सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:55 AM2023-07-25T11:55:26+5:302023-07-25T12:00:22+5:30
अन्नपूर्णा कॉलनीत राहणारी गोल्डी रायकवार ही बी.कॉम पास आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या ब्रह्माकुमारी वसतीगृहात राहून तिने आधुनिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण घेतले.
झाशी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय गोल्डी रायकवार हिने भगवान शंकराशी लग्न केलं आहे. या विवाह सोहळ्यात शिवलिंग रथावर ठेवून वरात काढण्यात आली. हारही घातला गेला. समारंभाला आलेल्या लोकांसाठी छान जेवण देखील होतं. झाशीच्या बडागाव गेटबाहेर असलेल्या ब्रह्माकुमारी आश्रमात हा अनोखा विवाहसोहळा पार पडला. सध्या या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
शहरातील अन्नपूर्णा कॉलनीत राहणारी गोल्डी रायकवार ही बी.कॉम पास आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या ब्रह्माकुमारी वसतीगृहात राहून तिने आधुनिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण घेतले. यानंतर, झाशीला परतल्यानंतर, गोल्डी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठात देवाची सेवा करण्याच गुंतली आहे.
गोल्डी रायकवार हिने सांगितलं की, मीराबाईने ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांना आपला पती म्हणून स्वीकारलं होतं, त्याच प्रकारे भगवान शंकराशी लग्न करण्याचा विचार लहानपणापासूनच होता. मी खूप आनंदी आहे की मी भगवान शंकराशी लग्न केलं आहे आणि त्यांना माझा पती बनवलं आहे. जे मला नेहमी साथ देतील.
दोन दिवसांपूर्वी तिने ब्रह्मकुमारी आश्रमातील बहिणींना भगवान शंकराशी विवाह करण्याची कल्पना सांगितली आणि त्यानंतर सर्वांच्या संमतीने सोहळ्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटली होती. वरात काढण्यात आली. पाहुण्यांना मेजवानी देण्यात आली आणि विवाह सोहळा पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.