Valentine's Day: सध्या आहात कुठे? जिओकडून व्होडाफोन, आयडिया, एअरटेलची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:00 PM2019-02-14T17:00:06+5:302019-02-14T17:06:06+5:30
जिओनं हटके स्टाईलमध्ये व्होडाफोन, आयडिया, एअरटेलला दिल्या शुभेच्छा
मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनं बाजारात उतरताच धमाका केला. जिओनं अगदी स्वस्तात इंटरनेट सेवा देत सर्वच कंपन्यांच्या तोंडाला फेस आणला. त्यामुळे जिओशी स्पर्धा करताना एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांना घाम फुटला. दूरसंचार सेवेत दिग्गज आणि प्रस्थापित कंपन्यांना टक्कर देणाऱ्या जिओनं त्याच कंपनीची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत जिओनं एअरटेल, व्होडाफोन, आयडियावर निशाणा साधला.
Roses are red,
— Reliance Jio (@reliancejio) February 14, 2019
Violets are blue,
Once a neighbour in SIM slot 2,
Where are you? 🤔
Happy Valentine's Day. #WithLoveFromJio
जिओनं स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा देत एअरटेल, व्होडाफोन, आयडियाला जबरदस्त टक्कर दिली. जिओमुळे या कंपन्यांना नुकसानदेखील सहन करावं लागलं. यानंतर आता व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत जिओनं या कंपन्यांची खिल्ली उडवली आहे. जिओकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. यातून इतर कंपन्यांना तुम्ही आहात कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. 'गुलाबाचा रंग लाल, वॉयलेट्सचा निळा, कधी शेजारच्या सिम स्लॉटमध्ये असणारे आता आहेत कुठे?' असा प्रश्न विचारत जिओनं इतर कंपन्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.
Dear @airtelindia, @VodafoneIN, @ideacellular, Happy Valentine’s Day. #WithLoveFromJio
— Reliance Jio (@reliancejio) February 14, 2017
जिओची सेवा इंटरनेट (4G Volte) वर आधारित आहे. त्यामुळे जिओचं सिम पहिल्या स्लॉटमध्येचं कार्यान्वित होतं. जिओ अतिशय कमी पैशात इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देतं. त्यामुळे अनेकजण जिओला प्राधान्य देतात. या कारणामुळे जिओचं सिम पहिल्या स्लॉटमध्ये ठेवलं जातं. सुरुवातीला जिओची सेवा फारशी चांगली नव्हती. त्यामुळे अनेकजण दुसऱ्या सिम स्लॉटमध्ये एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यासारख्या इतर कंपन्यांचं सिम ठेवायचे. मात्र जिओची सेवा सुधारल्यावर अनेकांनी दुसऱ्या स्लॉटमधून इतर कंपन्यांचं सिम काढून टाकलं. त्यामुळे या कंपन्यांचे ग्राहक कमी झाले. हाच संदर्भ घेत जिओनं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं इतर कंपन्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे जिओनं इतर कंपन्यांना ट्विटमध्ये टॅग करत त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.