कमाईचा अजब मार्ग, 2600 केस केल्या दाखल; नुकसान भरपाई मधून कमावले कोट्यावधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:44 AM2023-11-24T11:44:04+5:302023-11-24T11:44:21+5:30
आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत जो इतरांवर केस दाखल करून कमाई करतो.
आजकाल अशा अनेक घटना समोर येतात ज्यात लोक पैसा कमावण्यासाठी किंवा लवकर श्रीमंत होण्यासाठी विचित्र मार्ग निवडतात. कुणी आपला गॅस विकून पैसे कमावतात, कुणी काखेतील केस दाखवून कमावतात तर कुणी घाम विकून पैसे कमावतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत जो इतरांवर केस दाखल करून कमाई करतो. या व्यक्तीने आतापर्यंत 2600 केस दाखल केल्या आणि यातील अनेक केस जिंकून त्याने नुकसान भरपाई म्हणून कोट्यवधी रूपये कमाई केली.
ही व्यक्ती जगातील सगळ्यात वादग्रस्त व्यक्तींपैकी एक आहे. जोनाथन ली असं या व्यक्तीचं नाव आहे. तो जगात कुणावरही केस करतो. या केसेसमध्ये तो त्याला झालेल्या त्रासाच्या बदल्यात नुकसान भरपाई मागतो. या नुकसान भरपाईच्या रकमेतून त्याने आतापर्यंत कोट्यावधी रूपयांची कमाई केली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जोनाथनला विकीपिडियाद्वारे जगातील सगळ्यात मोठा फ्रॉडस्टर म्हटलं गेलं आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, पण...
आपल्या या कारनाम्यामुळे जोनाथनने वर्ल्ड रेकॉर्डही बनवला होता. गिनीज बुक ऑफ रेकार्ड्सनुसार, जोनाथनच्या नावावर जगात सगळ्यात जास्त केस दाखल करणाऱ्या व्यक्तीचा रेकॉर्ड आहे. पण रेकॉर्डसाठीही त्याने केस दाखल केली होती. त्याने गिनीज बुक ऑफ रेकार्ड्सवर त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या पर्सनल लाइफबाबत लिहिण्याचा आरोप करत केस दाखल केली होती. सगळ्यात मजेदार बाब म्हणजे जेव्हा एखादे न्यायाधीश त्याच्या केसमध्ये त्याच्या विरोधात निर्णय देतात तेव्हा तो त्यांच्यावरही केस दाखल करतो.