फक्त ४९ रुपये अन् मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालक; रातोरात नशीब पालटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:34 PM2023-04-06T15:34:19+5:302023-04-06T15:34:39+5:30
हा मेसेज आल्यानंतर मला आधी विश्वासच बसला नाही. मला नातेवाईकांनी फोन केले. त्याचसोबत आयजी ऑफिसमधूनही मला अभिनंदन करणारा कॉल आला
गोरखपूर - शहरातील सिकरीगंज परिसरात ड्यूटी करणाऱ्या होमगार्डचं नशीब रातोरात बदलेल असा विचारही कुणी केला नसावा. विवेकानंद सिंह असं या होमगार्ड जवानाचं नाव आहे. ४ तासांपूर्वी जेव्हा विवेकानंद झोपले होते तेव्हा त्यांचं आयुष्य सर्वसामान्य व्यक्तीसारखं फारसं काही खास नव्हते. रात्री १२ नंतर विवेकानंद यांनी फोन घेतला, मेसेज चेक केला तेव्हा त्यांचे नशिबच चमकलं. विवेकानंद ना केवळ कोट्यधीश बनला तर तो लग्झरी कारचा मालकही झाला होता.
मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालक
गोरखपूरच्या सिकरीगंज परिसरात तैनात असलेला होमगार्ड विवेकानंद सिंह ११२ नंबरची गाडी चालवत होता. तो आयपीएल मॅचवेळी ऑनलाईन अँपच्या माध्यमातून पैसे लावतो. मागील ६ महिन्यापासून तो असे करतोय. परंतु सोमवारी चेन्नई आणि लखनौ मॅचवेळी विवेकानंदने अँपच्या माध्यमातून ४९ रुपये लावले. त्यानंतर तो झोपी गेला. रात्री १२ वाजता डोळा उघडला तेव्हा त्याला आलेला मेसेज पाहून तो ताडकन उभा राहिला. त्याने १ कोटी रुपये आणि कार जिंकल्याचा हा मेसेज होता.
IG ऑफिसनं केलं कौतुक
होमगार्ड विवेकानंद सिंह म्हणाला की, हा मेसेज आल्यानंतर मला आधी विश्वासच बसला नाही. मला नातेवाईकांनी फोन केले. त्याचसोबत आयजी ऑफिसमधूनही मला अभिनंदन करणारा कॉल आला. इतके पैसे जिंकले तरीही मी माझी ड्युटी करत राहणार आहे. ड्युटी माझे कर्तव्य आहे. जिंकलेले पैसे माझ्या भविष्यासाठी घर, जमीन खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. शेतीसाठी पैसेही वाचवेन. लॉटरीत इतके पैसे जिंकेन असं मला कधी वाटले नव्हते. देवाने जे दिले त्याने खूप खुश आहे.
मुलांना पाहून पैसे लावायचे शिकलो
विवेकानंद सुट्टीवर घरी आला होता. तेव्हा छोट्या मुलांना पाहून मी ऑनलाईन अँपमध्ये पैसे लावून टीम बनवायला लागलो. त्यात मला रस येऊ लागला. टाइमपास म्हणून टीम बनवली. मागील ६ महिन्यांपासून असे करतोय. प्रत्येक दिवशी १५० रुपये मॅचवर लावतो. सोमवारी चेन्नई आणि लखनौ मॅचवेळी फक्त ४९ रुपये लावले होते. त्यानंतर मी कोट्यवधी जिंकले. कारही मिळाली. लॉटरी जिंकल्यामुळे घरात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.