पतीला सोडून दुसरं लग्न करण्याची इथे महिलांना असते मोकळीक, स्वत:च निवडतात जोडीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:41 PM2024-05-31T12:41:11+5:302024-05-31T12:44:12+5:30
आधीच लग्न झालेलं असताना जर या महिलांना एखादा दुसरा पुरूष आवडला तर त्या आधीच्या पतीला सोडून दुसरं लग्न करतात.
जगभरातील वेगवेगळ्या जमातींमधील वेगवेगळ्या प्रथा, चालीरिती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. काही जमातींमध्ये तर इतक्या आधुनिक रिती असतात की, त्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या समाजातही वापरल्या जात नाहीत. असाच एक समाज पाकिस्तानात आहे. कलाशा पाकिस्तानातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला समाज आहे. हा समाज आपल्या काही जुन्या वेगळ्या आणि काही आधुनिक परंपरांसाठी ओळखला जातो. जसे की, या समाजातील महिलांना आवडीचा जोडीदार निवडण्याची मोकळीक असते. इतकंच नाही तर आधीच लग्न झालेलं असताना जर या महिलांना एखादा दुसरा पुरूष आवडला तर त्या आधीच्या पतीला सोडून दुसरं लग्न करतात.
कलाशा समाजातील लोक खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल परिसराच्या बाम्बुराते, बिरीर आणि रामबूर इथे राहतात. या भागाचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. जसे की, या परिसराला सिकंदराच्या विजयानंतर कौकासोश इन्दिकौश म्हटलं जाऊ लागलं. यूनानी भाषेत याचा अर्थ आहे हिंदुस्तानी पर्वत असा होतो. या लोकांना सिकंदराचे वंशजही मानलं जातं.
येथील लोक माती, लाकडं आणि चिखलापासून तयार छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात. कोणताही उत्सव असेल तर महिला आणि पुरूष एकत्र मद्यसेवन करतात. कलाशा जमातीतील घरांमधील कामे जास्तीत जास्त महिलाच सांभाळतात.
इथे वर्षभरात तीन उत्सव होतात. Camos, Joshi आणि Uchaw. यातील Camos हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. यात महिला-पुरूष आणि तरूण-तरूणी एकमेकांना भेटतात. यादरम्यानच अनेक नाती जोडली जातात. महिलांना जर दुसरा पुरूष आवडला तर त्या त्याच्यासोबत राहू शकतात किंवा पळून जाऊन लग्न करू शकतात. त्यांना कुणीही विरोध करत नाहीत.
या समाजातील महिलांना त्यांचा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्या पती निवडतात, सोबत राहतात. पण जर लग्नानंतर जोडीदाराकडून सगळ्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर त्या कोणत्याही अडचणीशिवाय दुसरा पुरूष निवडू शकतात.
या समाजातील काही रिवाजही विचित्र आहेत. जसे की, कुणाचं निधन झालं तर त्यांच्यासाठी हा क्षण दु:खाचा नाही तर आनंदाचा असतो. अत्यंयात्रेवेळी हे लोक आनंद साजरा करतात. नाचतात-गातात आणि मद्यसेवन करतात. ते मानतात की, ते देवाच्या मर्जीने इथे आले आणि देवाच्या मर्जीनेच वर जातात.