VIDEO: काय सांगता?; मास्क न घातल्यानं पोलिसांकडून बकऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:07 PM2020-07-27T14:07:21+5:302020-07-27T14:08:15+5:30
पोलिसांची कारवाई ठरतेय चेष्टेचा विषय; मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर बकऱ्याची सुटका
कानपूर: गुन्हेगारीला आळा घालण्यात असमर्थ ठरणारे कानपूर पोलीस सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. कोरोना संकट काळात पोलीस अजब-गजब कारनामे करत आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कानपूरच्या बेकनगंज पोलिसांनी केलेली एक कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी चक्क एका बकऱ्यावर कारवाई केली आहे.
वीकेंड लॉकडाऊन दरम्यान मास्कशिवाय फिरणाऱ्या एका बकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यानंतर बकऱ्याच्या मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुझ्या बकऱ्याला घरातच ठेव. त्याला बाहेर सोडू नको, असा सल्ला पोलिसांनी बकऱ्याच्या मालकाला दिला. त्यानंतर बकऱ्याची सुटका झाली. पोलिसांनी केलेल्या हास्यास्पद कारवाईचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.
The caption paraphrased: Police in Kanpur, India, detain an unmasked goat. https://t.co/xidfVsbvxC
— Tunku Varadarajan (@tunkuv) July 26, 2020
उत्तर प्रदेश पोलीस सध्या त्यांच्या कार्यप्रणालीमुळे चर्चेत आहेत. गुन्हेगारी कारवाया रोखण्यात अपयशी ठरणारे पोलीस गरज नसलेल्या ठिकाणी कार्यक्षमता दाखवून देत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या अनेक कारवाया सध्या गमतीचा विषय झाला आहे. बेकनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस एका बकऱ्याला त्यांच्या जीपमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे. मास्क न घातल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेची माहिती मिळताच बकऱ्याच्या मालकानं पोलीस ठाणं गाठलं. त्यानं पोलिसांकडे बकऱ्याला सोडण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी मालकाला बकऱ्याला घराबाहेर न सोडण्याचा सल्ला दिला.