हौसेला मोल नाही! रक्षाबंधनाला भावाने दिली अनोखी भेट; बहिणींसाठी चंद्रावर खरेदी केली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 04:15 PM2023-08-31T16:15:21+5:302023-08-31T16:20:12+5:30
एका तरुणाने आपल्या बहिणींच्या नावे चंद्रावर जमीन खरेदी केली असून ती दोन्ही बहिणींना रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून दिली आहे.
भारतात चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग देशभरात चर्चेत आहे. दरम्यान, राजस्थानमधील करौली येथे एका तरुणाने आपल्या बहिणींच्या नावे चंद्रावर जमीन खरेदी केली असून ती दोन्ही बहिणींना रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून दिली आहे. चंद्रावर जमिनीची ही अनोखी भेट करौलीत चर्चेचा विषय बनली आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने करौली येथील तरुण अग्रवाल याने आपल्या दोन बहिणींसाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. करौली येथील प्रियंका आणि सोनिया अग्रवाल या दोन बहिणींसाठी जमीन खरेदी केली आहे. आता आयुष्यभर चंद्राकडे पाहत असताना त्यांना आठवेल की त्यांचीही चंद्रावर जमीन आहे. तरुण अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार, त्याने अमेरिकास्थित इंटरनॅशनल लूनर लँड अथॉरिटीकडून दीड महिन्यापूर्वी अर्ज करून चंद्रावर जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे.
दीड महिन्याच्या प्रक्रियेनंतर तरूण अग्रवाल याला रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी नकाशासह जमिनीचा हा तुकडा मिळाला. तरुण म्हणतो की चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी सुमारे 150 डॉलरचा खर्च आला. तरुण म्हणाला की, मला आशा आहे की ही भेट माझ्या बहिणींसाठी खूप मौल्यवान, संस्मरणीय आणि अद्वितीय असेल. चंद्रावर जमीन असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, जे मी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी माझ्या बहिणींना देऊन पूर्ण केलं.
आपण चंद्रावर जाऊ किंवा न जाऊ, माझ्या दोन्ही बहिणी जेव्हा-जेव्हा पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतील तेव्हा त्यांना नेहमी आठवेल की आपलीही चंद्रावर जमीन आहे. त्याचवेळी, सोनिया आणि प्रियंका या दोघी बहिणी सांगतात की, त्यांच्या भावाने दिलेली ही भेट त्यांच्यासाठी नेहमीच संस्मरणीय राहील. आम्ही दोघी बहिणी जगातील भाग्यवान बहिणी आहोत की रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी आम्हाला चंद्रावर जमीन मिळाली. आपण चंद्रावर जाऊ की नाही, भावाने दिलेली ही भेट आपल्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय राहणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.