shocking... स्वत:वर गोळी झाडल्यानंतरही 'तिला' मिळाले फेस सर्जरीमुळे जीवदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 06:18 PM2018-08-21T18:18:01+5:302018-08-21T18:38:54+5:30
पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये नॅशनल जिओग्राफी मॅगझिनच्या कव्हरपेजवर अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका मुलीचा फोटो छापण्यात येणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नॅशनल जिओग्राफीच्या यूट्यूब चॅनलवरूनही या मुलीवर करण्यात आलेली एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली होती.
पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये नॅशनल जिओग्राफी मॅगझिनच्या कव्हरपेजवर अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका मुलीचा फोटो छापण्यात येणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नॅशनल जिओग्राफीच्या यूट्यूब चॅनलवरूनही या मुलीवर करण्यात आलेली एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली होती. एवढ्या नामांकित मॅगझिनच्या कव्हरपेजवर यामुलीचा फोटो का छापण्यात येणार आहे? तिनं असं काय केलं आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले असतील. पण संपूर्ण जगभरात या मुलीची चर्चा होत आहे. जाणून घेऊयात या मुलीबाबत...
अमेरिकेमध्ये राहणाऱ्या या मुलीचं नाव केटी स्टबलफील्ड असून ती 21 वर्षांची आहे. नॅशनल जिओग्राफीच्या व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार आणि डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, केटीने काही वर्षांपूर्वी आपल्या हनुवटीतून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने यातून ती वाचली खरी, पण तिचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला. पण अमेरिकेतील डॉक्टरंच्या प्रयत्नांमुळे केटीचा पुर्नजन्म झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंतच्या सर्वाधिक वेळ चाललेल्या फेस ट्रान्सप्लांट सर्जरीमार्फत केटीला नवा चेहरा देण्यात आला आहे. तब्बल 31 तासांपर्यंत ही सर्जरी करत डॉक्टरांनी एक नवा इतिहास रचला. डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळे केटी आता आपलं नवं आयुष्य जगत आहे.
काय आहे 'हे' प्रकरण?
2014मध्ये 18 वर्षांच्या केटीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची ही अवस्था झाली होती. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या केटीने भावनांच्या भरामध्ये येऊन आपल्या हनुवटीतून गोळी झाडून घेतली होती. त्यामुळे तिचे डोळे, नाक आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आणि ती पूर्णतः विद्रुप दिसू लागली.
केटीची यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे जादूच - डॉक्टर
क्लीवलॅन्ड क्लिनिकद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार, ज्या हॉस्पिटलमध्ये केटीवर शस्त्रक्रिया झाली त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिचा पूर्णपणे विद्रुप झालेला चेहरा पूर्णपणे ठिक केला. डॉक्टरांच्या मते ही शस्त्रक्रिया म्हणजे एक जादूच आहे. क्लीवलॅन्ड क्लिनिकद्वारे जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेआधी संपूर्ण डॉक्टरांच्या टिमने खूप अभ्यास केला होता. त्यामध्ये 3डी प्रिंटींग आणि वर्च्युअल रियालिटी यांसारखं स्ट्रक्चर तयार केलं.
फेस ट्रान्सप्लांट करण्यात आलेली अमेरिकतील सर्वात कमी वयाची तरूणी
2016मध्ये 21 वर्षांच्या केटीला वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. एका वर्षांनंतर जेव्हा आपला चेहरा दान करणारा डोनर उपलब्ध झाला तेव्हा डॉक्टरांनी केटीच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. संपूर्ण जगभरात केटी चाळीसावी अशी व्यक्ती आहे, जिचं फेस ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. तिच्या चेहऱ्यावर 2017मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर केटी फेस ट्रान्सप्लांट करणारी अमेरिकेतील सर्वात लहान व्यक्ती ठरली. पण तरीही केटीला पुढचं आयुष्य अनेक उपचार आणि औषधांच्या आधारेच जगावं लागणार आहे. याव्यतिरिक्त तिला फिजिकल थेअरपी, स्पीच थेअरपी यांसारख्या उपचारांची मदत घ्यावी लागणार आहे.
नॅशनल जिओग्राफी मॅगझिनच्या कव्हर पेजवर येणार फोटो
केटी हळूहळू ठिक होत असून ती ब्रेल लिपी शिकत आहे. गोळी झाडल्यामुळे केटीचे स्वरयंत्र आणि डोळ्यांनाही इजा झाली होती. त्यामुळे केटीला बोलताना त्रास होत आहे. तसेच ती पाहू शकत नाही. केटी सध्या आत्मविश्वासाने आपल्या पायावर उभं राहण्याचा विचार करत आहे. आपल्या आयुष्यातील एवढं विचित्र वळण अनुभवल्यानंतर केटी आता आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची काउन्सिलर बवण्याचा विचार करत आहे. नॅशनल जिओग्राफीने पूढिल महिन्याच्या मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी केटीला फिचर केलं आहे.