लॉटरी विक्रेत्यालाच लागली लॉटरी; विक्री न झालेल्या तिकिटानं रातोरात झाला करोडपती
By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 01:08 PM2021-01-22T13:08:42+5:302021-01-22T13:33:25+5:30
लॉटरी विक्रेत्यानं जिंकले १२ कोटी; आता नवं घर बांधणार, कर्ज फेडणार
कोल्लम: आपण विक्री करत असलेल्या सर्व वस्तू विकल्या जाव्यात, असं प्रत्येक विक्रेत्याला वाटतं. केरळमधल्या कोल्लम तालुक्यात लॉटरीची तिकिटं विकणारे शराफुद्दीनदेखील त्याला अपवाद नाहीत. काही दिवसांपूर्वी तिकिटं विकत असताना शराफुद्दीन यांच्याकडे असलेली जवळपास सर्व तिकिटं विकली गेली. त्यांच्याकडे केवळ एकच तिकिट राहिलं होतं. मात्र तेच तिकीट शराफुद्दीन यांच्यासाठी लकी ठरलं. त्यांना तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली.
४६ वर्षांचे शराफुद्दीन कोल्लममध्ये लॉटरीची तिकिटं विकतात. ते तमिळनाडूच्या सीमेजवळ असलेल्या कोल्लम तालुक्यातल्या अर्यानकावू जवळच्या इराविधारामपुरममध्ये वास्तव्यास आहेत. शराफुद्दीन आधी आखाती देशात काम करायचे. पण सात वर्षांपूर्वी ते मायदेशी परतले. त्यांच्या कुटुंबात एकूण सदस्य आहेत. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी शराफुद्दीन लॉटरीची तिकिटं विकतात.
विक्री न झालेल्या तिकिटामुळे १२ कोटी रुपये जिंकलेल्या शराफुद्दीन आता या पैशातून घर बांधणार आहेत. याशिवाय डोक्यावर असलेलं कर्ज फेडून एक लहानसा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. शराफुद्दीन ९ वर्षे रियाधमध्ये होते. ते २०१३ मध्ये मायदेशात परतले. त्यानंतर त्यांनी अर्यानकावू परिसरात लॉटरी तिकिटं विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबात आई, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा आहे. शराफुद्दीन यांनी याआधीही लॉटरीची तिकिटं घेतली होती. त्यात त्यांना लहानलहान बक्षिसं मिळाली. मात्र पहिल्यांदाच त्यांना जॅकपॉट लागला आहे.
मंगळवारी शराफुद्दीन लॉटरी संचलनालयाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी त्यांच्याकडे असणारं तिकीट अधिकाऱ्यांना दाखवलं. शराफुद्दीन यांना १२ कोटींची लॉटरी लागली आहे. यातले साडे सात कोटी रुपये त्यांना मिळतील. १२ कोटींमधून ३० टक्के रक्कम कर म्हणून कापली जाईल. तर १० टक्के एजंटचं कमिशन असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.