130 किलो वजनाच्या हुकूमशहाला जनतेच्या लठ्ठपणाची चिंता, लॉन्च केली खास बीअर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:45 AM2023-12-28T11:45:32+5:302023-12-28T12:05:13+5:30
किम जोंग उनने नुकतीच एक वेगळ्या प्रकारची बीअर लॉन्च केली आहे. यामागचा उद्देश हा आहे की, लोकांनी बीअर तर प्यावी पण ती लाइट असावी.
आधीच्या काळात अनेक हुकूमशहा होऊन गेले, त्यांची नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चा होत असते. सध्या आजच्या काळातील उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची चर्चा सुरू असते. कारण त्याचे वेगवेगळे नियम. आपल्या अजब निर्णयांमुळे त्याची चर्चा नेहमीच होत असते. त्याचा असाच एक अजब नियम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
किम जोंग उन नेहमीच आपल्या देशातील लोकांवर कठोर नियम लावत असतो. स्वत: मद्यपान करून आणि सिगारेटी ओढून 130 ते 140 किलो वजन असलेल्या किमला यावेळी आपल्या जनतेच्या कंबरेची काळजी वाटत आहे. आपल्या नियमांमुळे आपल्या जनतेला नजरकैदेत ठेवणारा किम त्यांच्या उपासमारीवर उपाय करण्याऐवजी त्यांची कंबर बारीक करण्यावर जास्त लक्ष देत आहे. त्यासाठी त्याने एक बीअर लॉन्च केली आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, किम जोंग उनने नुकतीच एक वेगळ्या प्रकारची बीअर लॉन्च केली आहे. यामागचा उद्देश हा आहे की, लोकांनी बीअर तर प्यावी पण ती लाइट असावी. जेणेकरून त्यांचं वजन वाढू नये. या बीअरचं नाव आह Taedonggang. ही बीअर सरकारने तयार केली आहे. या बीअरला लो शुगर आणि कमी कॅलरी बीअर म्हटली जाते. जी खेळाडू आणि लठ्ठ लोकांसाठी फायदेशीर असेल. Rowan Beard नावाच्या टूर मॅनेजरने सांगितलं की, नॉर्थ कोरियामध्ये या बीअरची खूप डिमांड आहे. ज्याने पुरूषांचं वजन वाढणार नाही.
नॉर्थ कोरियामध्ये पुरूषांना दर महिन्यात 2 लीटर बीअरचं टोकण मिळतं. येथील नॅशनल ड्रिंक सोजू नावाची दारू आहे. जी तांदळापासून तयार केली जाते. दरम्यान सध्या नॉर्थ कोरियातील स्थिती अशी आहे की, बरेच लोक उपासमारीचे शिकार आहेत. किमने स्वत: काही दिवसांआधी महिलांना अपील केलं होतं की, जास्त बाळांना जन्म द्या आणि देशाच्या विकासात मदत करा. यावेळी तो रडलाही होता.