जाणून घ्या एकदिवसीय सामन्यात कोणत्या संघाच्या नावे किती शतकं आहेत
By admin | Published: August 18, 2016 02:51 PM2016-08-18T14:51:19+5:302016-08-18T16:34:03+5:30
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ आठच संघ असे आहेत. ज्यांच्या फलंदाजांनी १०० किंव्हा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकण्याची करामत केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आठ संघातील फंलदाजांनी 1,172 शतकं केली आहेत. या देशांच्या फलंदाजांनी १०० किंव्हा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकण्याची करामत केली आहे. सर्वोकृष्ट फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचं शतक करण्याच्या भीमपराक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. अशा पद्धतीच्या अनेक रेकॉर्डस् बद्दल आपण ऐकलं, वाचलं असेलचं. परंतु कोणत्या देशाच्या किती फलंदाजांनी एकूण किती शतकं केली याचा विचार केल्यास अनेक आश्चर्यकारक आकडेवारी मिळते.कोणत्या देशांनी किती शतकं केली आहेत याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तर चला जाणून घेऊयात कोणत्या देशाच्या नावे किती शतके आहेत.
८. न्यूझीलंड (११० शतकं )
१९७१ साली पहिला एकदिवसीय सामना खेळणारा न्यूझीलंड संघ सर्वात जास्त शतकं बनवणाऱ्या संघांमध्ये आठव्या क्रमांकावर येते. १९७१ पासून आत्तापर्यंत न्यूझीलंडने एकूण ७०३ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात या संघाच्या फलंदाजांनी एकदिवसीय सामन्यात एकूण ११० शतकं लगावली आहेत. नाथन एस्टल आणि रॉस टेलर या फलंदाजांनी सर्वाधिक शतकं न्यूझीलंडसाठी लगावली आहेत. या दोन फलंदाजांनी अनुक्रमे १६ आणि १५ शतकं केली आहेत.
७. इंग्लंड (१३८ शतकं )
साहेबाचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये फलंदाजांनी लागवलेल्या शतकांचा विचार करता इंग्लंडचा क्रमांक सातवा लागतो. इंग्लंड च्या फलंदाजांनी ६६९ सामन्यांत एकूण १३८ शतकं लागवलेली आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक शतकं मान मार्कस ट्रेसकोथिकने केली आहेत. त्याने १२३ सामन्यांत इंग्लंडसाठी एकूण १२ शतकं ठोकली आहेत.
६. दक्षिण आफ्रिका (१५८ शतकं )
एकदिवसीय क्रिकेटमध्ये उशिरा पदार्पण करणारा दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजांच्या शतकांत मात्र त्यांच्याही आधी आलेल्या इंग्लंड आणि न्युझीलँडला मागे टाकतो. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकूण १५८ शतकं केली आहेत. एबी डिव्हिलियसने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक म्हणजेच २४ शतकं लगावलेली आहेत. तर त्यापाठोपाठ हाशिम आमला (२३ शतकं ) आणि हर्शल गिब्स (२१शतकं ) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
५. श्रीलंका (१६० शतकं )
कोणत्या देशाच्या किती फलंदाजांनी एकूण किती शतकं केली याचा अभ्यास केल्यास श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाच्या फलंदाजांनी सारखीच म्हणजेच १६० शतक लागवल्याचं लक्षात येत. परंतु ही शतकं श्रीलंकेने वेस्ट इंडिजच्या तुलनेत अधिक सामन्यात केली असल्यामुळे श्रीलंकेचा क्रमांक पाचवा येतो. सनथ जयसूर्या (२८ शतकं ), कुमार संगकारा (२५ शतकं ) आणि तिलकरत्ने दिलशान (२२ शतकं ) या तीन फलंदाजांनी २० पॆसे अधिक शतकं श्रीलंकेकडून खेळताना लगावली आहेत.
४. वेस्ट इंडिज (१६० शतकं )
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या तुलनेत कमी सामन्यात १६० शतकं केली असल्यामुळे श्रीलंकेचा क्रमांक पाचवा येतो. वेस्ट इंडिजकडून खेळताना क्रिस गेल (२२ शतकं ), ब्रायन लारा (१९ शतकं ) आणि डेसमंड हेस (१७ शतकं ) यांनी सर्वात जास्त शतकं केली आहेत.
३. पाकिस्तान (१७२ शतकं )
पाकिस्तानच्या फलंदाजांनी ८३७ एकदिवसीय सामन्यांत एकूण १७२ शतकं लागवलेली आहेत. पाकिस्तानकडून सर्वाधिक शतकं सईद अन्वरने केली आहेत त्याने एकूण २० शतकं पाकिस्तानसाठी लगावली आहेत.
२. ऑस्ट्रेलिया (१९४ शतकं )
ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत एकूण ८७७ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्यांच्या फलंदाजांनी एकूण १९४ शतकं ठोकली आहेत. यात सर्वाधिक शतके रिकी पॉन्टिंगने (२९ शतकं ) केली असून त्या खालोखाल मार्क वॉ (१८ शतकं ) चा दुसरा क्रमांक लागतो.
१. भारत (२४० शतकं )
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या संघामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. भारतीय क्रिकेट संघ हा जगातील एकमेव असा संघ आहे कि याच्या फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत. भारतीय फलंदाजांनी आजपर्यंत एकूण ८७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४० शतकं लगावली आहेत. भारतातर्फे सर्वाधिक शतकं बनवली असल्याच्या यादीत सचिन तेंडुलकर (४९ शतकं), विराट कोहली (२५ शतकं ) आणि सौरव गांगुली (२२शतकं ) या खेळाडूचा समावेश आहे. असं असलं तरी विराट चा चालू फॉर्म पाहता तो भारतीय संघाला शतकं फटकावण्याच्या या यादीत नवीन उंचीवर नेऊन ठेवेल यात शंकाच नाही.