टॅबलेट्स आणि कॅप्सूल वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? आजारांशी असतो का संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 04:08 PM2024-03-22T16:08:49+5:302024-03-22T16:09:21+5:30
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, गोळ्यांचा रंग वेगवेगळा का असतो? चला आज याचं उत्तर जाणून घेऊ....
Reason for Medicine Color : औषधांचं किंवा डॉक्टरांचं नाव घेताच अनेकांना घाम फुटतो. कारण जास्तीत जास्त लोकांना औषधं आवडत नसतात. पण आजारी पडल्यावर बरं होण्यासाठी औषधं तर घ्यावीच लागतात. अशात जेव्हाही कुणी आजारी पडतं तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं आणली जातात. यावेळी तुम्ही लक्ष दिलं असेल की, टॅबलेट्स किंवा कॅप्सूल वेगवेगळ्या रंगांच्या असतात. पण यामागचं कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, गोळ्यांचा रंग वेगवेगळा का असतो? चला आज याचं उत्तर जाणून घेऊ....
मानवी जीवनाचा विकास होत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या जडी-बुटी आणि आयुर्वेदिक औषधांचा शोध लावला. त्यावेळी औषधं टॅलबेट किंवा कॅप्सूलच्या रूपात नव्हती तर ती झाडपत्तीच्या रूपात होती. नंतर या जडी-बुटी किंवा झाडांचा रस म्हणजे अर्क काढून ते पावडरमध्ये रूपांतरित करून गोळ्या बनवल्या गेल्या. असं मानलं जातं की, औषधांचा गोळ्यांच्या रूपात वापर सगळ्यात आधी इजिप्तमध्ये झाला. त्यावेळी औषधं एक खास माती किंवा ब्रेडमध्ये मिक्स करून तयार केली जात होती.
रंगीबेरंगी कॅप्सूलची सुरूवात
यूरोपमध्ये 1960 च्या आसपास औषधे पांढऱ्या रंगाच्या गोळ्यांच्या रूपात तयार केली जाऊ लागली. नंतर हाय टेक्नॉलॉजी विकसित झाल्यावर औषधांच्या निर्माणात बदल करण्यात आला. 1975 च्या आसपास रंगीबेरंगी कॅप्सूल तयार केल्या जाऊ लागल्या. लिक्विड औषधांमध्येही रंग टाकले गेले.
वेगवेगळ्या रंगाची का असतात औषधे
रिपोर्टनुसार, सध्या औषधांच्या कॅप्सूल तयार करण्यासाठी 75 हजारांपेक्षा जास्त कलर कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. तेच टॅबलेटच्या कोटिंगसाठीही वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी लोकं औषधांची नावं वाचून त्यात फरक करू शकत नाही, ते औषधांचा रंग बघून सहज त्यात फरक करू शकतात. रंगांमुळे त्यांना औषधांमध्ये फरक करणं सोपं जातं.
एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, ज्या आजारांमध्ये कमी पॉवरची औषधे दिली जातात, त्यांचा रंग हलका असतो. तर लगेच प्रभाव करणाऱ्या औषधांचा रंग गर्द असतो. इतकंच नाही तर गंध आणि टेस्टच्या आधारावरही औषधांचा रंग ठरवला जातो.