आयडियाची कल्पना! दहावीच्या विद्यार्थ्याने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली 'जबरदस्त बाईक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:02 IST2022-09-13T12:51:56+5:302022-09-13T13:02:35+5:30
रजनीश असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने भंगारातून बाईक तयार केली आहे. विशेष म्हणजे बाईकसाठी 3,000 रुपये खर्च आला असून एक लीटर पेट्रोलमध्ये 120 किमी प्रवास होत असल्याचा दावा केला आहे.

फोटो - news18 hindi
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने कमाल केली आहे. रजनीश असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने भंगारातून बाईक तयार केली आहे. विशेष म्हणजे बाईकसाठी 3,000 रुपये खर्च आला असून एक लीटर पेट्रोलमध्ये 120 किमी प्रवास होत असल्याचा दावा विद्यार्थ्याने केला आहे. सध्या त्याच्या या हटके बाईकने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरीच्या मैलानी येथील कोतवाली परिसरात राहणारा दहावीचा विद्यार्थी रजनीश कुमार याला एक महागडी बाईक घ्यायची होती. पण पैशांअभावी तो घेऊ शकला नाही. मात्र, भंगारातून वस्तू खरेदी करून अवघ्या तीन हजाराची जुगाड बाईक बनवण्यात तो यशस्वी झाला. एक लीटर पेट्रोलमध्ये ही बाईक 120 किमी चालते, असा त्याचा दावा आहे.
दहावीचा विद्यार्थी असलेल्या रजनीश कुमारने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे महागडी बाईक घेण्यासाठी पैसे नव्हते. पण, बाईक चालवायची खूप इच्छा होती, म्हणून स्वस्तात बाईक बनवावी म्हणजे शाळेत किंवा कुठेही जाणे सोपे जाईल असा विचार केला. यासाठी त्याने शेतात वापरले जाणारे पेट्रोलवर चालवणारे फवारणी करणारे मशीन भंगारातून खरेदी केलं.
भंगारातून त्याने ही मशीन खरेदी केली. त्याची मोटार काढली आणि ती दुरुस्त केली, मोटारसायकलचे काही सामान घेतले आणि सायकलमध्ये काही बदल करून ती मोटार त्यात बसवली. सुमारे 1 आठवड्याच्या मेहनतीनंतर त्याने त्या सायकलचे बाईकमध्ये रूपांतर केले. आता ही जुगाड बाईक ताशी 30 किलोमीटर वेगाने धावते आणि 1 लीटरमध्ये 120 किलोमीटरचा प्रवास करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.