50 अब्जांचा महाल, सोन्याचं विमान-कार; या सुल्तानाची लाइफस्टाईल वाचून व्हाल अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 03:39 PM2023-12-21T15:39:12+5:302023-12-21T15:51:55+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशाच एका सुल्तानाबाबत सांगणार आहोत जो जगातील सगळ्यात श्रीमंत मानला जातो.
जगभरातील जास्तीत जास्त देशांमध्ये लोकशाही आहे. म्हणजे जनतेने निवडून दिलेले सरकार. पण आजही काही देश आहेत जिथे राजेशाही चालते. देशाचा कारभार राजा आणि सुल्तान चालवतात. आज आम्ही तुम्हाला एका अशाच एका सुल्तानाबाबत सांगणार आहोत जो जगातील सगळ्यात श्रीमंत मानला जातो.
या सुल्तानाचं नाव आहे ब्रुनेईचा सुल्तान हसनल बोल्कियाह. याचं पूर्ण नाव हसनल बोल्कियाह इब्नी उमर अली सैफुद्दीन तृतीय (Hassanal Bolkiah ibni Omar Ali Saifuddien III) असं आहे. त्याचं वय 77 आहे. ब्रुनेई हा देश आपल्या भरपूर तेल भांडारासाठी ओळखला जातो. तर येथील एकूण लोकसंख्या 4 लाखांच्या आसपास आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका रिपोर्टनुसार, या सुल्तानाची एकूण संपत्ती 2 लाख 88 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. डेलीस्टारनुसार, त्याच्याकडे एक प्रायव्हेट प्लेनही आहे जो सोन्याने तयार करण्यात आलंय. 3 हजार 359 कोटीच्या प्रायव्हेय जेटमध्ये 959 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू आहेत. यात सोन्याचे वॉश बेसिनही बसवण्यात आले आहेत.
या सुल्तानाच्या कलेक्शनमध्ये फरारी, लॅम्बोर्गिनी, पोर्श, बेंटले, रॉल्स रॉयस, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, जगुआर, लैंड रोवर, ऑडी…अशा अनेक लक्झरी गाड्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच्याकडे 183 लॅंड रोव्हर, 275 लॅम्बोर्गिनी, 350 पेक्षा जास्त बेंटले कार आहेत. असं म्हणतात की, या सुल्तानाकडे 7 हजार लक्झरी कार आहेत.
असंही म्हटलं जातं की, ब्रुनेईच्या या सुल्तानचा महाल जगात सगळ्यात मोठा आहे. ज्याला ‘इस्ताना नुरुल इमान पॅलेस’ नावाने ओळखलं जातं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याचं नाव नोंदवलं आहे. असंही सांगण्यात येतं की, 20 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या आलिशान महालात एकूण 1700 रूम्स, 257 पेक्षा जास्त बाथरूम, अनेक स्वीमिंग पूल, गाड्यांसाठी अनेक गॅरेज आहेत. या महालात अनेक ठिकाणी सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
ब्रुनेईच्या सुल्तानाने 3 लग्ने केली होती. ज्यातील हरजाह आणि अरिनाज नावाच्या राण्यांना त्याने घटस्फोट दिला होता. सुल्तानाकडे स्वत:चे प्राणी संग्रहालयही आहेत. ज्यात जवळपास 30 बंगाल टायगर आहेत. तसेच इतरही अनेक प्राणी आहेत.
हसनल बोल्कियाहचा जन्म 15 जुलै 1946 मध्ये झाला होता. वडिलांचं नाव सुल्तान उमर अली सैफुद्दीन III होतं. त्याने 2017 मध्ये राजा म्हणून 50 वर्ष पूर्ण केली. तो ब्रुनेईचा 29वा सुल्तान आहे. 1984 मध्ये इंग्रज गेल्यापासून तो देशाचा पंतप्रधान म्हणूनही काम करत आहे.