गुन्हेगाराचा असाही मकबरा, इथे त्याचा स्टायलिश पुतळा आणि आवडीची Audi Q5 कार केली आहे तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:52 AM2019-10-29T11:52:08+5:302019-10-29T11:57:06+5:30
वेगवेगळ्या प्रसिद्ध लोकांच्या मकबऱ्यांबाबत आपण ऐकलं आहे. अनेक मकबरे तुम्ही पाहिले देखील असतील. पण आज आम्ही तुम्हाला एक अशा मकबऱ्याबाबत सांगणार आहोत.
वेगवेगळ्या प्रसिद्ध लोकांच्या मकबऱ्यांबाबत आपण ऐकलं आहे. अनेक मकबरे तुम्ही पाहिले देखील असतील. पण आज आम्ही तुम्हाला एक अशा मकबऱ्याबाबत सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. हा मकबरा एका गुन्हेगाराचा असून हा मार्बलने तयार करण्यात आला आहे.
ट्रक लुटणारा एंटोनियो
एंटोनिया 'इल तोंतो'(म्हणजे मुर्ख) असं त्याचं नाव होतं. वयाच्या ४६ व्या वर्षी त्याचं निधन झालं. एंटोनियो हा ट्रक लुटेरा म्हणूनच ओळखला जात होता. तसा तर तो वेगवेगळे गुन्हे करायचा, पण तो ट्रक लुटण्यासाठी कुख्यात होता. स्पेनच्या ग्रेनाडामध्ये जिथे त्याला दफन करण्यात आलं, तिथे त्याची एक स्टाइलने बसलेली प्रतिमा तयार केली आहे. आणि त्याच्यासमोर त्याची आवडती ऑडी क्यू ५ एसयूव्ही कार तयार केली आहे.
६० वेळा तुरूंगवारी
एंटोनिया ६० पेक्षा अधिक वेळा तुरूंगात गेला होता. तो ट्रक लुटायचा आणि त्यातील महागड्या वस्तू विकत होता. यातून त्याने भरपूर पैसा कमावला आणि पैसा उडवला सुद्धा. त्याने एक लुटलेल्या वस्तू विकण्यासाठी एक सुपरमार्केटही काढलं होतं. महागडे परफ्यूम, कॉम्प्युटर, घड्याळे सगलंच विकायचा. गेल्यावर्षी त्याला कथित ७ ट्रक चोऱ्यांप्रकरणी अटक करण्यात आली होती.
जसा तो होता तशीच प्रतिमा
एंटोनियो जिथे राहत होता त्या परिसरातील लोकांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. स्थानिक लोकांनीच त्याच्या मकबऱ्याला असं रूप दिलंय. या मकबऱ्यावर त्याची प्रतिमा, दोन मोबाइल फोन, एक सिगारेटचं पॅकेट, हाताला रोलेक्सची घड्याळ, ब्रेसलेट, सोन्याची चेन, गुचि ब्रॅन्डची हॅंडबॅग. या सर्व वस्तू तो वापरत होता.
ऑडीऐवजी करणार होते फरारी
असे सांगितले जाते की, एंटोनियोला त्याच्या ऑडी कार फार आवडायची. या कारमधूनच तो चोऱ्या करायचा. आधी त्याच्या परिवाराने मकबऱ्यावर फरारी कार तयार करण्याची विचार केला होता.एंटोनियोकडे फरारी कार सुद्धा होती. पण तरी त्यांनी ऑडी कार तयार केली. कारण त्याला ही जास्त पसंत होती.
रोज ठेवले जातात ताजे फूल
एंटोनियोच्या गावाची लोकसंख्या १० हजार इतकी आहे. असे म्हणतात की, त्याने गावातील लोकांसाठी खूपकाही केलंय. त्यामुळेच त्याच्या मकबऱ्यावर लोक रोज ताजी फुलं ठेवून जातात.