रस्त्यावरून चालत असलेल्या व्यक्तीच्या अंगावर कोसळली वीज, उडाला आगीचा लोळ, तरीही ती व्यक्ती राहिली जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:13 AM2021-12-27T11:13:24+5:302021-12-27T11:23:21+5:30
Jara Hatke News: रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीवर आकाशातून विजेचा लोळ कोसळूनही ती व्यक्ती जिवंत राहिल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
जाकार्ता - रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीवर आकाशातून विजेचा लोळ कोसळूनही ती व्यक्ती जिवंत राहिल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इंडोनेशियामध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून चालत जात असलेल्या व्यक्तीच्या अंगावर अचानक आकाशातून वीज कोसळताना दिसत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्ती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. त्या दिवशी वीज थेट त्याच्या शरीरावर कोसळली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्तामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. ही घटना घडली तेव्हा सदर व्यक्ती ड्युटीवर होती. त्याचवेळी अचाकन वीज त्याच्या अंगावर कोसळली. या घटनेचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सदर व्यक्ती ही पावसामध्ये छत्री घेऊन रस्त्यावरून जाताना दिसत आहे. तसेच आजूबाजूला अवजड वाहनेही दिसत आहेत. दरम्यान, सदर व्यक्ती फ्रेममध्ये आल्यानंतर सुमारे १५ सेकंदांनंतर अचानक स्फोटासारखा आवाज येतो. तसेच ही व्यक्ती चालत असलेल्या ठिकाणी आगडोंब उसळलेला दिसतो. त्यानंतर ही व्यक्ती रस्त्यावर पडून घडपडत उठताना दिसते. मात्र त्याला उठता येत नाही.
Security officer in Jakarta was struck by lightning while on duty, avoid using radio and cellular telephones when it is raining, the condition of the victim survived after 4 days of treatment. not everyone has the same chance to live. 当選確率 #Bitcoin#NFTs$BTC$ETH#ALERTpic.twitter.com/4XhW6Oh3U9
— Lexus RZ (@Heritzal) December 26, 2021
त्यानंतर पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी आजूबाजूहून लोक धावताना दिसत आहेत. ही गेल्या आठवड्यात घडली होती, तसेच रविवारी तिचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. सुदैवाची बाब म्हणजे सदर सिक्युरिटी गार्ड हा एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही बालंबाल बचावला. त्याच्या हातावर जळाल्याचा खुणा आहेत. त्याला आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहे. या गार्डच्या हातात वॉकीटॉकी होती. त्यामुळे वीज आकर्षित होऊन त्याच्यावर पडली, असा दावा करण्यात येत आहे.