जेवण भरवणाऱ्यालाच सिंह बनवणार होता त्याचं जेवण, इतक्यात घडलं असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:27 PM2022-05-05T17:27:27+5:302022-05-05T17:27:39+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राणीसंग्रहालयात दररोज खाणं देणाऱ्या व्यक्तीवरच सिंहाने भयंकर हल्ला केला आहे. हल्ल्याचं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे (Lion attacks on zookeeper).
कधीच पाहायला न मिळणारे जंगलातील प्राणी सहजपणे पाहता यावेत म्हणून अशा प्राण्यांना प्राणीसंग्रहायलात ठेवलं जातं. जंगलात स्वतः शिकार करून आपलं पोट भरणाऱ्या या प्राण्यांना प्राणीसंग्रहायलात विशिष्ट वेळेला खाणं दिलं जातं. प्राणीसंग्रहालयात असले तरी त्या प्राण्यांचा मूळ स्वभाव बदलणारा नाही. हे खतरनाक प्राणी कधी आपलं भयंकर रूप दाखवतील सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राणीसंग्रहालयात दररोज खाणं देणाऱ्या व्यक्तीवरच सिंहाने भयंकर हल्ला केला आहे. हल्ल्याचं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे (Lion attacks on zookeeper).
दक्षिण आफ्रिकेच्या मकरेले प्रिडेटर सेंटरमधील ही घटना. इथं काम करणाऱ्या माइक होडगेवर सिंहाने खतरनाक हल्ला केला आहे. माइक आणि त्यांचं कुटुंब दक्षिण आफ्रिकेतील थाबाजीबीमध्ये लायन रिझर्व्हची देखभाल करतात. माइक तिथं सिंहांना आपल्या मुलांप्रमाणे पाळतो. पण ज्यांना आपण पाळत आहोत, त्यापैकीच एखादा सिंह आपल्यावर हल्ला करेल याचा त्याने विचारही केला नव्हता. ज्या सिंहाने त्याने लहानपणापासून खायला घातलं त्याच सिंहाने त्याच्यावर अटॅक केला.
नेहमीप्रमाणे तो सिंहाला पिंजऱ्यात खायला द्यायला गेला होता. पण सिंहाने त्यालाच आपल्या जबड्यात धरलं आणि दूरपर्यंत फरफटत नेलं. सिंहाने माइकवर केलेला हल्ला पाहून इतर कर्मचाऱ्यांना घाम फुटला. पण त्याला सिंहाच्या तावडीतून सोडवण्याची हिंमत करणार कोण? सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागले.
अखेर काय कुणास ठाऊक सिंहाला काय वाटलं त्याने माइकला आपल्या जबड्यातून सोडलं आणि तिथून निघून गेला. माइकचं नशीब चांगलं म्हणून तो सिंहाच्या तावडीतून सुटला. पण तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीराची हालचालही होत नव्हती. त्याच्या शरीरावर सिंहाच्या दातांच्या जखमा होत्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून आता त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या घटनेनंतर माइकच्या मनात सिंहांबाबत भीती निर्माण झाली आहे. पण तरी त्याने आपलं प्राणीसंग्रहालयातील काम सुरूच ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.