Lockdown: लॉकडाऊनमध्ये अडकले हिंदू नवरीचं कुटुंब; मुस्लीम कुटुंबाने कन्यादान करत पार पाडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 10:17 AM2020-06-03T10:17:55+5:302020-06-03T10:18:47+5:30
भटियानला राहणारी पूजा आणि साहनेवाल येथे राहणाऱ्या सुदेश कुमारचं लग्न लॉकडाऊन पूर्वी ठरलं होतं. पूजाचं कुटुंब उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे राहतं
लुधियाना – देशात एकीकडे हिंदू-मुस्लीम यांच्यातील विरोधाच्या बातम्या येत असतात तर दुसरीकडे हिंदू-मुस्लिमांची एकताही दिसून येते. पंजाबच्या लुधियानामध्ये अडकलेल्या एका हिंदू जोडप्याचे मुस्लिम कुटुंबानं लग्न लावून दिले. खास गोष्ट म्हणजे हे लग्न संपूर्ण हिंदू परंपरेनुसार झाले, मुस्लिम कुटुंबाने सर्व विधी पार पाडले. अगदी मुस्लिम जोडप्याने त्या नवरीचं कन्यादानही केलं.
भटियानला राहणारी पूजा आणि साहनेवाल येथे राहणाऱ्या सुदेश कुमारचं लग्न लॉकडाऊन पूर्वी ठरलं होतं. पूजाचं कुटुंब उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे राहतं. लॉकडाऊन होण्यापूर्वी वडील वरिंदर कुमार, आई, भाऊ आणि तीन बहिणी मूळ गावाला गेले होते, पण लॉकडाऊनमुळे सर्व कुटुंब गावात अडकले, कुटुंबीयांनी लुधियानाला पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्यांना परवानगी मिळाली नाही.
बिहारमधील कटियार येथे राहणारा अब्दुल साजिद जे पूजाच्या वडिलांसोबत सूत कारखान्यात काम करतात. जेव्हा त्यांना वरिंदरच्या समस्येची जाणीव झाली तेव्हा त्यांनी पूजाच्या वडिलांसमोर तिचं लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा ते आनंदी झाले. अब्दुल म्हणाले, जेव्हा मुलाच्या बाजूने मला पूजाच्या पालकांबद्दल विचारले, तेव्हा मी वरिंदरची समस्या त्यांना सांगितली, त्या लोकांना येण्याची परवानगी मिळत नाही, मी लग्नाची सर्व तयारी केली आहे. पंडित मच्छिवाडा येथून बोलावले. हिंदू विवाह विधी केले. सात फेरे पूर्ण केले. कन्यादानच्या वेळी मी माझी पत्नी सोनीसह कन्यादान देखील केले.
अब्दुल यांनी पत्नीसमवेत लग्नात पंगतदेखील वाढली. इतकेच नाही तर त्यांनी पूजाला भेट म्हणून डबल बेड्स, कपाटं आणि भांडीसुद्धा दिली. पूजा आम्हाला मामा बोलते, आम्ही गेल्या पाच वर्षांपासून वरिंदरच्या कुटुंबाला ओळखतो. पूजाच्या लग्नात आम्हाला काही कमी ठेवण्याची इच्छा नव्हती. आम्ही जमेल तसे सर्व केले. पूजाच्या वडिलांनीही काही पैसे पाठवले होते असं अब्दुल यांनी सांगितले.
अब्दुल यांची पत्नी सोनीने सांगितले की, पूजा आमच्या मुलीसारखी आहे. म्हणून तिच्या लग्नात कोणतीही कमतरता राहू नये ही आमची इच्छा होती, लॉकडाऊनमुळे नियमांचे पालन कर लग्नाचे विधी पार पाडले. या चार जणांव्यतिरिक्त नवरदेवाच्या दोन बहिणी आणि त्यांचे कुटुंब फक्त उपस्थित होते. नवरदेवाच्या कुटुंबाने काही मागितले नाही पण पूजाला घरातून रिकाम्या हाताने सोडायची नाही, म्हणून तिला भेट आणि काही रुपये दिले आमच्या इच्छेनुसार दिले.