Lockdown: लय भारी! घरी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने ‘या’ पठ्ठ्याने काय केलं पाहा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 08:43 AM2020-06-04T08:43:06+5:302020-06-04T08:44:33+5:30
लल्लन सहपरिवार गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचं तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवस प्रयत्न करुनही लल्लनला तिकीट मिळालं नाही,
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात मजुरांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक ट्रेन चालवण्यात येत आहे. मात्र लाखो मजुरांच्या तुलनेत सोडलेल्या काही मोजक्याच श्रमिक ट्रेन सोडल्याने अनेकांना घरी जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातच लॉकडाऊन काळात अनेक अजब-गजब किस्से ऐकायला मिळाले.
काही मजूर कित्येक किमी पायी अंतर कापत होते, तर अनेकांनी घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. सध्या असाच एक किस्सा गाझियाबाद शहरात राहणाऱ्या पेंटर लल्लनसोबत घडला आहे. गोरखपूरला राहणाऱ्या लल्लनला लॉकडाऊनकाळात घरी जायचं होतं. लॉकडाऊनमध्ये पहिल्या दोन टप्प्यात काहीच व्यवस्था नव्हती मात्र तिसऱ्या टप्प्यात सरकारने मजुरांसाठी विशेष ट्रेन सुरु केल्या. त्यानंतर लल्लनच्या मनात घरी जाण्याची ओढ लागली.
लल्लन सहपरिवार गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचं तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवस प्रयत्न करुनही लल्लनला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्याने घरी जाण्याची दृढ निश्चयच केला. तीन दिवस वाट पाहूनही तिकीट न मिळाल्याने चौथ्या दिवशी लल्लन बँकेत गेला आणि १ लाख ९० रुपये काढून आणले. त्यानंतर सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी मार्केटला दिला. त्याठिकाणी दीड लाखात त्याने कार खरेदी केली आणि कुटुंबाला घेऊन गोरखपूरला त्याच्या गावी परतला. यानंतर पुन्हा गाव सोडून जाणार नाही अशी शपथच त्याने घेतली.
याबाबत लल्लनने सांगितले की, बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचा धोका होता. श्रमिक ट्रेनने घरी जाण्यासाठी प्रयत्न केला परंतु तोदेखील यशस्वी झाला नाही, त्यामुळे बचत केलेल्या पैशातून एक कार खरेदी केली आणि गावी परत आलो. कुटुंबाला गोरखपूरला पुन्हा आणण्यासाठी संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च केली पण माझं कुटुंब सुरक्षित राहिलं याचा आनंद आहे असं तो म्हणाला. लॉकडाऊन काळात असे बरेच किस्से लोकांसाठी सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.