तब्बल १४ कोटी वर्षांआधी समुद्रात बुडालेला महाद्वीप सापडला, संशोधकांनी केले अनेक खुलासे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:08 PM2019-10-04T15:08:04+5:302019-10-04T16:36:04+5:30
अनेकदा संशोधकांना वेगवेगळे शोध करत असताना असं काही हाती लागतं, जे पाहून जगभरातील हैराण होतात. आता हेच बघा ना.
(Image Credit : wcvb.com)
अनेकदा संशोधकांना वेगवेगळे शोध करत असताना असं काही हाती लागतं, जे पाहून जगभरातील हैराण होतात. आता हेच बघा ना. भूमध्य समुद्रात संशोधकांना असंच काहीसं आश्चर्यचकित करून सोडणारं सापडलं आहे. भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. संशोधकांना इथे एका हरवलेला महाद्वीप सापडला. ज्याचं नाव ग्रेटर एड्रिया आहे. सोबतच संशोधकांनी असंही स्पष्ट केलं की, हा द्वीप अटलांटीसचं हरवलेलं शहर नाहीये.
गेल्या महिन्यात गोंडवाना रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला. त्यात सांगण्यात आलं की, ग्रीनलॅंडच्या आकाराच हा महाद्वीप साधारण १४ कोटी वर्षाआधी उत्तर आफ्रिकेतून वेगळा होऊन भूमध्य समुद्रात बुडाला होता.
(Image Credit : indiatoday.in)
उट्रेक्त विश्वविद्यालयात वैश्विक टेक्टोनिक्स आणि पोलियोजियोग्राफीचे प्राध्यापक डेव वान हिंसबर्गेन यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने पर्यटक ग्रेटर एड्रियाच्या शोधलेल्या महाद्वीपावर दरवर्षी सुट्टी घालवण्यासाठी येतात. पण याबाबत त्यांना काहीच माहीत नाही.
(Image Credit : sciencealert.com)
प्राध्यापक डेव म्हणाले की, रिसर्चदरम्यान आढळलं की, ग्रेटर एड्रियातील जास्तीत जास्त पर्वतरांगा एकल महाद्वीपातून तयार झाल्या होत्या आणि या पर्वतरांगा २० कोटी वर्षांआधी उत्तर आफ्रिकेतून वेगळ्या झाल्या होत्या. या महाद्वीपावर एकमेव शिल्लक राहिलेला भाग म्हणजे एक पट्टी आहे. जी इटलीच्या ट्यूरिन शहरातून एड्रियाटिक समुद्रापर्यंत जाते.
संशोधकांनुसार, ग्रेटर एड्रियाचा जास्तीत जास्त पाण्याच्या आत होता. वेगवेगळ्या गोष्टींनी तो झाकला गेला होता. वाळू आणि वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे थर यावर जमा झाले आणि त्यातून डोंगर तयार झाले. हळूहळू हे डोंगर पर्वतरांगांमध्ये बदलले. यातूनच आल्प्स, एपिनेन्स, बाल्कन, ग्रीस आणि तुर्कीतील पर्वतरांगांची निर्मिती झाली. या हरवलेल्या महाद्वीपाचे अवशेष तुर्कीतील टॉरसच्या पर्वतरांगांमध्ये बघितले जाऊ शकतात.