प्लेन क्रॅश झालं, ट्रेन दरीत कोसळली, कारमध्ये जळाला, तब्बल ७ वेळा भीषण अपघातातून असा वाचला 'हा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:51 PM2021-09-09T18:51:18+5:302021-09-09T18:51:45+5:30
क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं.
मृत्यू कधी, कुठे कसा येईल सांगू शकत नाही. मृत्यूवर कोणीही मात करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही. मृत्यू होणं न होणं आपल्या हातात नाही. असं असताना क्रोएशियातील फ्रेन सेलाकने (Frane Selak) मात्र एकदा-दोनदा नव्हे तर चक्क सात वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. त्याचा मृत्यू होणार नाही, असं जणू त्याला वरदानच मिळालं आहे. त्याला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती मानलं जातं. (World luckiest man)
फ्रेनचा जन्म १९२९ साली क्रोएशियात झाला. नशीब घेऊनच तो जन्माला आला. फ्रेन ७ भयंकर अपघातातलून वाचला आहे. विमान, रेल्वे, बस आणि कार अशा सर्व गाड्यांच्या अपघातात तो सापडला. पण त्याचं नशीब इतकं बलवत्तर की वारंवार त्याचा जीव वाचला. नशीबाने त्याला मृत्यूच्या दाढेतून वेळोवेळी बाहेर काढलं.
१९६२ साली एका ट्रेन दुर्घटनेतून तो बचावला. साराजेवाहून डबरोवनिक रेल्वे प्रवास करताना ट्रेन एका नदीत कोसळली. त्यावेळी तब्बल १७ प्रवाशांचा मृत्यू झाला. फ्रेनच्या एका हाताला फक्त दुखापत झाली. तो पोहोत नदीकिनारी आला.
यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी विमान दुर्घटनेतही तो सापडला. जाग्रेबहून रिझेकासाठी विमानाने टेक ऑफ केलं. त्यानंतर विमानापासून एक दरवाजा वेगळा झाला आणि दुर्घटना झाली. यामध्ये एकुण १९ जणांनी आपला जीव गमावला. पण फ्रेन एका गवताच्या ढिगाऱ्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला सापडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं तो शुद्धीवर आला.
त्यानंतर १९६६ साली तो बसने प्रवास करत होता, तेव्हा बस नदीत कोसळली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पण फ्रेन वाचला. १९७० फ्रेनच्या कारचं फ्युल टँक फुटलं होतं, तेव्हासुद्धा सुदैवाने फ्रेन त्यातून बचावला. १९७३ साली आणखी एक कार दुर्घटना झाली. त्याच्या कारला आग लागली. पण त्यात तोसुद्धा भाजला पण त्याचा जीव वाचला. १९९५ साली पुन्हा एक बस अपघात झाला. जाग्रेब बसने त्याला पाडलं होतं.
त्याच्या पुढच्या वर्षीच फ्रेनचा शेवटचा अपघात झाला. डोंगर असलेल्या रस्त्यावर एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली आणि त्याच्या कारचा विस्फोट झाला. पण तो वेळीच कारमधून बाहेर आला आणि या भयंकर दुर्घटनेतूनही तो बचावला.
इतक्या वेळा अपघातातून कोण कसं काय वाचू शकतं? हे जगातलं आठव आश्चर्यच आहे. त्यामुळेच फ्रेनला नशीबवान समजलं जातं आहे.