दम असेल तर पकडून दाखवा! भररस्त्यात पोलिसांना चॅलेंज देत 'तो' फरार झाला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:25 PM2021-09-14T16:25:04+5:302021-09-14T16:25:24+5:30
भररस्त्यात पोलिसांना थेट आव्हान देत कार चालक सुस्साट निघून गेला
दमोह: मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये एक भलताच किस्सा घडला आहे. पोलिसांनी एका कार चालकाकडून ५ दिवसांनंतर पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईनंतर वाहतूक पोलीस दलातील महिला अधिकाऱ्याचा आनंद गगनात मावत नाहीए. पाच दिवसांपूर्वी अधिकाऱ्याला चकवा देत चालक फरार झाला होता. दम असेल तर पकडून दाखवा, असं आव्हान देत चालक कारसह निघून गेला होता. अखेर पाच दिवसांनंतर तोच चालक महिला अधिकाऱ्याच्या तावडीत सापडला.
दमोहमधल्या मुक्तिधाम चौकात वाहतूक पोलीस अधिकारी आकांक्षा जोशी कर्तव्य बजावत होत्या. पाच दिवसांपूर्वी त्यांनी रजनीश तिवारी नावाच्या एका कार चालकाला रोखलं. त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्यानं पाचशे रुपयांची पावती फाडण्यात आली. मात्र रजनीश तिवारी दंड न भरताच तिथून पसार झाला. दम असेल तर मला पकडून दाखवा, असं आव्हान त्यानं पळून जाताना पोलिसांना दिलं.
नशेचं औषध घातलेलं दूध पतीला पाजलं; ५० हजार अन् २ तोळं सोनं घेऊन नवरी पसार झाली
रजनीश तिवारीच्या नावानं पोलिसांनी पावती तयार केली होती. मात्र दंड न भरता तो फरार झाल्यानं अखेर आकांक्षा जोशींना स्वत:च्या खिशातून दंडाची रक्कम भरावी लागली. पोलीस रजनीशचा शोध घेत होते. मात्र तो काही सापडला नाही. मात्र सोमवारी रजनीश तिवारी वाहतूक पोलिसांच्या समोर आला. आकांक्षा जोशींनी मोबाईलचा कॅमेरा सुरू करत कार चालकाचा फोटो काढला. त्याला दंड भरायला लावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला दंड आकारल्याची पावती दिली.