'या' गावात आजपर्यंत झाला नाही एकाही बाळाचा जन्म, ना गावात आहे कुणाची समाधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:51 AM2019-03-23T10:51:52+5:302019-03-23T10:55:23+5:30
जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी तेथील अंधविश्वास आणि वेगळ्या रितीरिवाजांमुळे चर्चेत असतात. दक्षिण घानामध्ये असंच एक गाव आहे 'माफी दोवे'.
जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी तेथील अंधविश्वास आणि वेगळ्या रितीरिवाजांमुळे चर्चेत असतात. दक्षिण घानामध्ये असंच एक गाव आहे 'माफी दोवे'. गावात राहणाऱ्या लोकांची संख्या साधारण ५ हजार आहे. पण या गावाचं वेगळेपण म्हणजे या गावात आजपर्यंत एकाही बाळाचा जन्म झाला नाही. इतकेच नाही तर या गावात कुणाची समाधी सुद्धा नाही. तसेच गावातील लोक जनावरे सुद्धा पाळत नाहीत.
प्रसूतीसाठी दुसऱ्या गावात
घानामध्ये असे अनेक समुदाय आहेत ज्यांचे विचित्रि नियम आणि कायदे आहेत. पण माफी दोवे हे त्याहून वेगळं गाव आहे. गावातील लोकांची असं मानतात की, या गावात जर एखाद्या बाळाचा जन्म झाला तर देव नाराज होतील आणि गावाला श्राप देतील. त्यामुळे गावात जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिला प्रसूतीसाठी शेजारच्या दुसऱ्या गावात नेण्यात येतं.
गावात ना जनावरे ना समाधी
या गावीत तीन फार विचित्रि नियम आहेत ज्यांचं पालन गावातील लोक करतात. माफी दोवेमध्ये तुम्हाला छोटे पक्षी किंवा कोणतं जनावरही कुणाच्या घरात दिसणार नाही. पण आकाशात उडणारे पक्षी दिसतात. या गावातील लोक खाण्यासाठी दुसऱ्या गावातून प्राणी आणू शकतात, पण त्यांना त्याच दिवशी त्या प्राण्याचा बळी द्यावा लागतो. कारण या गावात पशुपालनावर बंदी आहे. तसेच या गावात कुणाचीही समाधी नाही. कुणावर अंत्यसंस्कारही करायचे असतील तर दुसऱ्या गावात जावं लागतं.
अनेकदा जीव येतो धोक्यात
गावात जर एखादी महिला गर्भवती राहत असेल तर आणि तिच्या डिलेव्हरीला कालावधी जवळ आला तर त्या महिलेला १ ते २ महिने आधीच गावातून दूर ठेवलं जातं. अनेकदा असंही होतं की, महिलेला दुसऱ्या गावात घेऊन जातानाही प्रसूती होते. हे फारच धक्कादायक आणि जीवघेणं असं आहे. पण गावातील लोक याला देवाची मर्जी मानतात.
आकाशवाणी झाल्याचं मानतात...
असे सांगितले जाते की, माफी दोवे गावाचे संस्थापक तोगबे ग्बेवफिया अकिति एक शिकारी होते. ते जेव्हा पहिल्यांदा शिकारीला गेले तेव्हा एक आकाशवाणी झाली. त्यात सांगण्यात आले की, ही जागा पवित्र आहे आणि शांत आहे. जर इथे रहायचं असेल तर तीन नियमांचं पालन करावं लागेल. इथे पशुपालन केलं जाऊ नये, कुणाची समाधी बांधू नये आणि गावात बाळाचा जन्म होऊ नये.
महिलांच्या विरोधामुळे एक महत्त्वाचा बदल
गेल्या काही वर्षात महिलांनी आवाज उठवला होता की, त्यांना गावातच बाळाला जन्म देण्याची मुभा द्यावी. यावर गावातील वयोवृद्धांनी नकार दिला होता. मात्र महिलांनी आपली मागणी रेटून धरली. त्यामुळे गावाच्या सीमेबाहेर एका छोटं रूग्णालय उभारण्यात आलं आहे. जेणेकरून गावाच्या जवळच प्रसूती करता यावी.