“फाईव्ह, सेव्हन स्टार नाही; ही जागा म्हणजे 10 स्टार,” वाचा का म्हणाले Anand Mahindra असं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:05 PM2022-06-12T19:05:17+5:302022-06-12T19:08:02+5:30
Anand Mahindra Tweet : भारतीय लष्कराकडून चालवला जातो हा कॅफे. पाहा काय आहे यात खास?
Anand Mahindra Tweet : महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते काही नवीन गोष्टी सोशल मीडियावर शेअरही करत असतात. त्यांच्या पोस्टना चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळते. अनेकदा ते भारतातील काही विशेष जागांबद्दलही सांगत असतात. आता त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक कॅफेचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच तो १० स्टार पेक्षा कमी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
आनंद महिंद्रांनी ट्विटरवर ज्या कॅफेचा व्हिडीओ शेअर केला आहे, तो भारतीय लष्कराद्वारे चालवला जातो. Log Hut Cafe नावानं प्रसिद्ध असलेली ही सुंदर जागा काश्मीरमधील गुरई खोऱ्यातील बंदिपोरा नजीक आहे. भारतीय लष्करानं हा कॅफे गुरई खोऱ्यातील लोकांना समर्पित केला आहे. तसंच या कॅफेचा अॅम्बिअन्स खुप चांगला आहे.
As far as I’m concerned, this Cafe is not a 5 star, nor a 7 star, but a 10 star destination! pic.twitter.com/oQZvEOanlT
— anand mahindra (@anandmahindra) June 11, 2022
सर्वकाही मिळतं स्वस्त
हा कॅफे किती खास आहे हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसंच कॅफेच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून या ठिकाणी अन्नपदार्थही स्वस्त मिळत असल्याचं दिसून येतंय. चिली पनीरसारखा पदार्थ १५० रूपये, तर नॉन व्हेज बिर्याणीसारखा पदार्थ १८० रूपयांना मिळतो. इतकंच नाही, तर गुरईच्या खोऱ्यात बसून तुम्ही हुक्क्याचा आनंदही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ३०० रूपये द्यावे लागतील. तर रिफिल करण्यासाठी तुम्हाला १५० रूपये द्यावे लागतील.
दरम्यान, सीमावर्ती भागांमध्ये लष्कराकडून अशा प्रकारचे कॅफे चालवले जातात. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. तसंच काहींनी अरूणाचल प्रदेश, तवांग आणि उरीमध्ये चालवल्या जाण्याच्या लष्कराच्या कॅफेबद्दलही माहिती दिली आहे.