Makar sankranti 2018 : बॉलिवूडने 'या' गाण्यांसोबत साजरी केली मकरसंक्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 08:59 AM2018-01-13T08:59:00+5:302018-01-13T08:59:00+5:30
बॉलिवूडच्या या गाण्यांमध्ये चित्रीत केली आहे मकरसंक्रांती आणि पतंगबाजीची धुम. गोडव्याचा हा सण अनुभवा बॉलिवूडसोबत.
मुंबई : नविन वर्षातला हिंदुंचा पहिला सण आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठा गुळ, तीळ आणि पतंगांनी भरल्या आहेत. पतंग उडवणे हा मकरसंक्रातीचा अविभाज्य घटक. मुंबईसह महाराष्ट्र-गुजरातमध्ये यादिवशी लोक भरपुर प्रमाणात पतंग उडवतात. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालकही आपल्या घराच्या किंवा इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवतात. अनेक मैदानांत पतंग महोत्सव आयोजित केले जातात. गुजरातचा ‘उत्तरायण’ हा पतंग महोत्सव तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. या फार पुर्वीपासूनच्या प्रथेला बॉलिवूडही साक्षीदार आहे. त्यांनीसुध्दा बऱ्याचदा हे पतंग उडवणं साजरं केलंय आपल्या चित्रपटांतून आणि आपल्या गाण्यांमधून. गोडव्याचा आणि पतंगांचा हा उत्सव आपल्या लाडक्या हिरो - हिरोईनींनी आणि दिग्दर्शकांनी फार सुंदररित्या साजरा केलाय. आज यानिमित्ताने पाहुयात बॉलिवूडची अशीच काही गाणी ज्यांच्यासोबत आपल्याला मकरसंक्रांत साजरी करताना येईल आणखी जास्त मज्जा.
१) उडी उडी जाये - रईस
तुमच्या यावर्षीच्या मकरसंक्रांतीच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं सगळ्यात पहिलं असायला हवं. २०१७ मध्ये आलेल्या शाहरुखच्या रईस चित्रपटातील उडी उडी जाये हे गाणं सध्याचं सर्वात ताजं मकरसंक्रांतीचं गाणं आहे. खास मकरसंक्रांतीसाठी हे गाणं लाँच करण्यात आलं होतं. या गाण्यात शाहरुख आणि माहिरा कसे भेटतात आणि त्यांच्यात प्रेम बहरतं हे दाखवण्यात आलंय.
२) मांझा - काय पो चे
काय पो चे या नावातच सगळं काही आहे. पतंग उडवताना दुसऱ्याचा पतंग काटल्यानंतर विजय साजरा करताना गुजरातीमध्ये काय पो चे असं म्हटलं जातं. आपल्या आयुष्यातही दुसऱ्याची पतंग कापून आपलं भलं केल्यानंतर आपण कसा असुरी आनंद साजरा करतो हे सांगण्यात आलंय. चित्रपटात सुशांतसिंग राजपुत आणि राजकुमार राव यांच्या भूमिका आहेत. आयुष्यात येणाऱ्या वाईट अनुभवांवर मात करत कसं यश मिळवायचं हेच या गाण्यात गीतकाराने लिहीलं आहे.
३) रुत आ गयी रे - अर्थ
आमीर खान या गाण्यात अभिनेत्री नंदिता दासला पतंग उडवणं शिकवतो. या सगळ्या प्रक्रियेत खुप रोमान्स भरलेला असतो. सुखविंदर सिंगने गायलेल्या या गाण्यात दंग व्हायला होतं.
४) ढील दे - हम दिल दे चुके सनम
जेव्हा जेव्हा हे गाणं कानावर पडतं तेव्हा तेव्हा आपल्यासमोर पतंग उडवणारे ते सगळे उभे राहतात. हे गाणं गुजराती कुटूंबावर चित्रीत ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाची ओळख आहे. पतंग उडविताना दोन गटांत लागणाऱ्या चुरशीची मजा या गाण्यात गीतकाराने करुन दिली आहे. या गाण्यात कौटुंबिक मजेसह सलमान-ऐश्वर्याचा रोमान्सही पाहायला मिळतो.
आम्ही आशा करतो की ही मकरसंक्रांती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. सोबतच गुळाचा गोडवा आणि तिळाला पकडून ठेवण्याची गुळाची वृत्ती तुमच्याही अंगी येवो, अशा सदिच्छा. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.