बाबो! फक्त ३ मिनिटांत संपवले ८८ केक, पठ्ठ्याने केला वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:55 PM2022-03-04T17:55:14+5:302022-03-04T17:57:15+5:30
काही लोक मोठ्या डिशेस कमी वेळेत संपवण्याचं चॅलेंज (Food Challenge) स्वीकारताना आणि ते जिंकताना आपण पाहतो. सोशल मीडियावरही (Social Media food challenge video) अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात.
काही लोकांना खाण्या-पिण्याची खूप आवड असते. तुम्ही त्यांना कितीही पदार्थ खायला द्या, ते खाऊन पचवायचे कसे हेही त्यांना माहिती असतं. काही लोक मोठ्या डिशेस कमी वेळेत संपवण्याचं चॅलेंज (Food Challenge) स्वीकारताना आणि ते जिंकताना आपण पाहतो. सोशल मीडियावरही (Social Media food challenge video) अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात.
मॅक्स स्टॅनफोर्ड (Max Stanford) अशीच एक व्यक्ती आहे, की ज्याने या छंदातून विश्वविक्रम (World Record) केला आहे. डेझर्ट म्हणून कमी अधिक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या जाफा केकचे (Jaffa Cake) ८८ तुकडे अवघ्या तीन मिनिटांत घशाखाली उतरवण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यानी केलं आहेत. हा विक्रम करण्यासाठी ३४ वर्षांच्या मॅक्स स्टॅनफोर्डने सरासरी दोन सेकंदात एक जाफा केक खाल्ला आणि तो घशातून खाली जावा यासाठी गरम पाणी पित राहिला.
अशा प्रकारे त्याने अत्यंत वेगात म्हणजेच केवळ तीन मिनिटांत ८८ जाफा केक सहा ग्लास गरम पाण्यासोबत अक्षरशः गिळले. त्यांचा हा वेग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. मात्र अशा पद्धतीनं खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचं मॅक्स स्टॅनफोर्ड यांनी सांगितलं.
प्रोफेशनल ईटर (Professional eater) म्हणजेच केवळ खाद्यपदार्थ सेवनातून पैसे कमावणाऱ्या मॅक्स स्टॅनफोर्ड यांनी यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये जाफा केक्स खाऊन विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी १८० सेकंदात म्हणजेच ३ मिनिटांत ३६ जाफा केक खाल्ले होते. यावेळी मात्र त्यांनी ८८ केक खाल्ले. द सनच्या वृत्तानुसार, त्यांनी या स्पर्धेसाठी केवळ एकदाच सराव केला होता आणि ते हे रेकॉर्ड करण्यात यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी ४० सेकंदात २० केक खाल्ले होते. मात्र आपण ८८ केक खाऊ शकू असा विश्वास त्यांना नव्हता. पण सराव आणि प्रशिक्षणामुळे त्यांनी हे यश मिळवले.
मॅक्स स्टॅनफोर्ड हे नेहमी खाण्याचं चॅलेंज स्वीकारतात आणि खाण्याशी संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. त्यांचं एक युट्युब चॅनेल (Youtube Channel) असून, त्यावर ते आठवड्यातून एकदा खाण्याच्या चॅलेंजसंबंधीचा व्हिडीओ अपलोड करत असतात. त्यांनी नुकतंच ५.५ किलोग्रॅम चिकन टिक्का मसाला आणि भातासह २० चॉकलेट खाण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. ब्रिटनमधल्या दक्षिण लंडनचे रहिवासी असलेले मॅक्स खाण्याचे शौकीन असले तरी यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचं आवर्जून नमूद करतात.