ओ डॉक्टर, बघा हा साप मला चावला! रुग्णालयात जाऊन त्यानं डबाच उघडला, सगळ्यांची घाबरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:50 AM2021-10-28T11:50:26+5:302021-10-28T11:51:59+5:30
सापानं दंश करताच तरुण संतापला; सापाला प्लास्टिकच्या डब्यात भरुन झाकण लावलं
हरदोई: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मोगली पुरवा गावात एक भलताच प्रकार घडला आहे. एका तरुणाला काळ्या सापानं दंश केला. त्यामुळे संतापलेल्या तरुणानं सापाला पकडून एका डब्यात बंद केलं. त्यानंतर तो त्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात जाऊन तरुणानं डबा उघडला. त्यातील साप पाहून डॉक्टरांसह सारेच घाबरले आणि सैरावैरा पळू लागले.
सर्पदंश होताच तरुण संतापला. रागाच्या भरात त्यानं सापाला एका डब्यात भरलं. तोच डबा घेऊन त्यानं रुग्णालय गाठलं. तिथे त्यानं डॉक्टरांनी भेट घेतली. त्यानं डबा उघडून हाच साप मला चावला असून आता मला भोवळ येत असल्याचं सांगितलं. डब्यात असलेला काळा नाग पाहून डॉक्टरांसह रुग्णालयात उपस्थित असलेले सगळेच जण घाबरले. रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सगळ्यांचीच तारांबळ उडाली. डॉक्टरांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि तरुणावर उपचार सुरू केले.
मोगली पुरवा गावात वास्तव्यास असलेला मुकेश कुमारला सापानं दंश केला. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. एका काळ्या रंगाच्या सापानं मुकेशला दंश केला आणि तो पळू लागला. त्या सापाला मुकेशनं पकडलं आणि एका प्लास्टिकच्या डब्यात बंद केलं.
सापाला डब्यात बंद करून मुकेश थेट जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पोहोचला. त्यावेळी डॉक्टर एमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. मुकेश थेट डॉक्टरांसमोर जाऊन उभा राहिला. सर्पदंश झाल्याचं त्यानं डॉक्टरांना सांगितलं. मुकेशनं डॉक्टरांसमोर प्लास्टिकचा डबा उघडला. त्यातला साप बाहेर काढला. त्याला पाहून डॉक्टरांची घाबरगुंडी उडाली. आधी सापाला डब्यात बंद कर, मग तुझ्यावर उपचार करतो, असं डॉक्टरांनी मुकेशला सांगितलं.
साप रुग्णालयात कशाला घेऊन आलास, असा प्रश्न डॉक्टरांनी मुकेशला विचारला. त्यावर, तुला कोणत्या सापानं दंश केला असं तुम्ही विचारलं असतं, तर तुम्हाला काय सांगायचं हा विचार करून मी सापच डब्यातून घेऊन आलो, असं उत्तर मुकेशनं दिलं. सध्या मुकेशची प्रकृती स्थिर असून वन विभागाच्या पथकानं सापाला ताब्यात घेतलं आहे.