...म्हणून मी ३ दुकानांची कुलूपं फोडून फक्त २० रुपये चोरले; जबाब ऐकून पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:49 AM2022-03-31T10:49:24+5:302022-03-31T10:51:45+5:30
एका रात्रीत ३ दुकानांची कुलूपं फोडली, फक्त २० रुपये चोरले; अजब चोरीची संपूर्ण शहरात चर्चा
सीकर: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातल्या फतेहपूरमध्ये चोरीची एक अजब घटना घडली आहे. एका चोरानं सोमवारी रात्री दुर्गा मार्केटमधील तीन दुकानांची कुलूपं फोडली. विशेष म्हणजे त्यानं केवळ २० रुपयेच चोरले. चोराला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्यानं दिलेलं उत्तर ऐकून पोलिसांची अवस्था हसावं की रडावं अशी झाली. सध्या पोलीस आरोपीच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.
नेमकं काय घडलं?
दुर्गा मार्केटमध्ये असलेल्या कपड्यांच्या तीन दुकानांची कुलूपं रात्री उशिरा फोडण्यात आली. त्यानंतर सकाळी मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दुकानांची पाहणी करून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यात त्यांना चोर दिसली.
दुकानांची कुलूपं फोडून आत शिरलेली व्यक्ती आसिफ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काही वेळातच त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीतून समोर आलेली माहिती ऐकून पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कुरकुरे खाण्यासाठी २० रुपये हवे असल्यानं तीन दुकानांची कुलूपं फोडल्याचं आसिफनं पोलिसांना सांगितलं.
आसिफची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी आसिफच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दुकानांची कुलूपं फोडण्यात आल्याची माहिती पसरताच व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली. मात्र दुकानांतून कोणतंही सामान चोरीला गेलं नसल्याचं पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.