सहकाऱ्याच्या पादण्याला वैतागला कर्मचारी; मागितली तब्बल 12 कोटींची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:58 PM2019-03-26T14:58:59+5:302019-03-26T14:59:51+5:30
कर्मचाऱ्याची भरपाईसाठी न्यायालयात धाव
मेलबर्न: सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीनं त्रस्त झालेल्या एका कर्मचाऱ्यानं त्याच्या जुन्या कंपनीकडे अजब भरपाई मागितली आहे. कंपनीतील एका सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीमुळे मला प्रचंड त्रास सहन करावा लागल्यानं 1.8 मिलियन डॉलरची (12.4 कोटी रुपये) भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील इंजिनियरनं केली आहे. यासाठी त्यानं कायदेशीर पावलं उचलत खटला दाखल केला.
ऑफिसमधील एक माजी सहकारी वारंवार माझ्याजवळ येऊन पादायचा. कित्येक महिने मी त्याचा सहन केला. त्यामुळे मला 1.8 मिलियन डॉलर इतकी रक्कम भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील एका इंजिनियरनं त्याच्या जुन्या कंपनीकडे केली. डेव्हिड हिंगेस्ट असं या इंजिनियरचं नाव आहे. जुना सहकारी ग्रेग शॉर्टच्या पादण्याच्या सवयीमुळे छळ झाल्याचा दावा डेव्हिडनं केला होता. त्यासाठी त्यानं न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र त्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला. तुमची छळवणूक झाल्याचा कोणताही पुरावा या प्रकरणात दिसत नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं.
'मी ऑफिसमध्ये भिंतीकडे तोंड करून बसायचो. ऑफिसचा आकार अतिशय लहान होता. त्याठिकाणी ग्रेग हा माझा सहकारी होता. तो माझ्या जवळ येऊन पाहायचा आणि तिथून निघून जायचा. दिवसातून पाच-सहावेळा तो अशा प्रकारे मला त्रास द्यायचा,' असं हिंगेस्टनं न्यायालयाला सांगितलं. मॅनेजर असलेल्या ग्रेगनं अनेकदा फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र न्यायमूर्ती फिलिप प्राईस्ट यांनी त्यांचा अपील अर्ज फेटाळला.