रेस्टॉरंटमध्ये थंड फ्राईज दिले म्हणून ग्राहकाने पोलिसांना केला फोन, मात्र त्यालाच झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 05:52 PM2022-08-18T17:52:47+5:302022-08-18T17:55:42+5:30
तुम्हाला आश्चर्य वाटेल एका व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये थंड पदार्थ खायला दिले म्हणून थेट पोलिसांनाच फोन केला. यातही धक्कादायक म्हणजे रेस्टॉरंटची तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच पोलिसांनी तुरुंगात डांबलं आहे.
एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात, तुम्हाला खूप जोराची भूक लागली आहे आणि तुम्ही दिलेली ऑर्डर यायला उशीर होतो आहे. अशावेळी तुम्हाला राग येतो. इतक्या वेळानेही तुमच्यासमोर थंड पदार्थ आणून ठेवले तर साहजिकच तुमच्या रागाचा पारा चढतो. अशावेळी तुम्ही हॉटेलचा वेटर, मॅनेजर किंवा मालकावर राग काढाल. यापेक्षा जास्त तर तुम्ही काही करणार नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये थंड पदार्थ खायला दिले म्हणून थेट पोलिसांनाच फोन केला. यातही धक्कादायक म्हणजे रेस्टॉरंटची तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच पोलिसांनी तुरुंगात डांबलं आहे.
आता रेस्टॉरंटमध्ये थंड पदार्थ मिळाल्याची तक्रार पोलिसात करणं तसं ते थोडं विचित्र आहेच. पण तक्रार करणाऱ्या ग्राहकालाच पोलिसांनी तुरुंगात डांबणं हेसुद्धा त्यापेक्षा विचित्र आहे. हे सर्वकाही आपल्या पचनी पडणारं नाही. त्यामुळे नेमकं तिथं असं काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. जस्टिस सर्व्ड नावाच्या रेडिट अकाऊंटवर या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.
जॉर्जियामध्ये 8 ऑगस्टला घडलेली ही घटना एक व्यक्ती केनेसॉतील एका McDonald’s आउटलेटमध्ये खायला गेली. तिथं तिला थंड पदार्थ देण्यात आले त्यामुळे ती भडकली आणि थेट पोलिसांना फोन केला. इतक्या छोट्याशा तक्रारीवरून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पण त्यांनी आऊटलेटवर कारवाई केली नाही तर तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच अटक केली आणि तुरुंगात डांबलं.
आता पोलिसांनी असं का केलं, असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल. ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली त्याचं नाव अँटोनी सिम्स आहे. जो 24 वर्षांचा आहे. अँटोनी एक गुन्हेगार आहे. 2018 सालापासून पोलीस त्याला शोधत होते.
थंड फ्रेंज फ्राइझ पाहून या व्यक्तीला आपण गुन्हेगार आहोत, आपण पोलिसांपासून दूर पळत आहोत याचा विसर पडला आणि त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून बोलावलं. पण त्याआधी रेस्टॉरंटच्या मॅनेजरनेही पोलिसांना फोन करून बोलावलं होतं आणि त्या व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या.