प्रेमासाठी काय पण! फ्लाइटसाठी पैसे नव्हते, पत्नीला भेटण्यासाठी भारतातून सायकलने गाठलं युरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:13 PM2023-05-25T12:13:53+5:302023-05-25T12:15:45+5:30
महानंदिया चार्लोट यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले, तर महानंदिया यांच्या साधेपणाने चार्लोटचे मन जिंकले.
भारतातील आर्टिस्ट प्रद्युम्न कुमार महानंदिया यांची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांना पीके महानंदिया या नावाने ओळखले जाते. स्वीडनची रहिवासी चार्लोट वॉन शेडविन या त्यांच्या पत्नी आहेत. दोघेही 1975 मध्ये दिल्लीत भेटले होते. जेव्हा चार्लोट यांनी महानंदिया यांच्या कलेबद्दल ऐकले तेव्हा त्या त्यांना भेटण्यासाठी युरोपमधून भारतात आल्या. त्यांच्याकडून स्वत:चं एक पोर्ट्रेट बनवून घ्यायचं ठरवलं. महानंदिया जेव्हा चार्लोट यांचे पोर्ट्रेट बनवत होते तेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
महानंदिया चार्लोट यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले, तर महानंदिया यांच्या साधेपणाने चार्लोटचे मन जिंकले. चार्लोटची स्वीडनला घरी परतण्याची वेळ आली तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बीबीसीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत महानंदिया म्हणाले होते. "जेव्हा त्या माझ्या वडिलांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्यांनी साडी नेसली होती. मला माहित नव्हतं की त्या हे सर्व कसे हाताळतील. वडिलांच्या आणि घरच्यांच्या आशीर्वादाने आदिवासी परंपरेने आमचा विवाह झाला." स्वीडनला जाताना चार्लोट यांनी महानंदियाला सोबत येण्यास सांगितले. पण महानंदियाला त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे होते.
पत्राद्वारे दोघेही एकमेकांशी जोडलेले राहिले. एका वर्षानंतर महानंदिया यांनी आपल्या पत्नीला भेटण्याचा प्लॅन केला, पण विमानाचे तिकीट घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व विकून त्यांनी एक सायकल विकत घेतली. पुढच्या चार महिन्यांत त्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि तुर्की पार केलं. त्यांची सायकल वाटेत अनेक वेळा तुटली आणि अनेक दिवस अन्नाशिवाय राहावे लागले. पण कितीही मोठी अडचण आली तरी ते डगमगले नाहीत.
पीके महानंदिया यांनी 22 जानेवारी 1977 रोजी हा प्रवास सुरू केला. ते दररोज सायकलने 70 किलोमीटरचा प्रवास करत असे. महानंदिया म्हणतात, "कलेने मला वाचवले आहे. मी लोकांचे पोर्ट्रेट बनवले आणि काहींनी मला पैसे दिले, तर काहींनी मला जेवण आणि राहण्याची सोय दिली. 28 मे रोजी ते इस्तंबूल आणि व्हिएन्ना मार्गे युरोपला पोहोचले आणि ट्रेनने गोटेन्बर्गला गेले. येथे दोघांनी अधिकृतपणे लग्न केले. मला युरोपच्या संस्कृतीबद्दल काहीच माहिती नव्हती. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं पण प्रत्येक पावलावर पत्नीने मला साथ दिली." आता हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह स्वीडनमध्ये राहतं. त्यांची लव्हस्टोरी सध्या व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.