कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तो चक्क जंगली अस्वलाशी भिडला, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 08:14 PM2022-01-24T20:14:54+5:302022-01-24T20:15:40+5:30
अस्वल घरातील दोन लहान कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो.
माणसाचे कुत्र्याशी सर्वात जवळचे नाते आहे. कुत्रा त्याच्या मालकासाठी काहीही करायला तयार असतो. तर, मालकही आपल्या पाळीव कुत्र्यासाठी कुठलीही हद्द पार करतात. अशाच प्रकारची एक घटना अमेरिकेत घडली आहे, जिथे आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मालक चक्क जंगली अस्वलाशी भिडला.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातून नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस त्याच्या घरात उभा असताना अचानक एक जंगली अस्वल दरवाजातून आत घुसण्याचा प्रयत्न करतो. अस्वल त्या घरातील दोन लहान पाळीव कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो. यादरम्यान तो अस्वल त्या व्यक्तीच्या अंगावर पंजे मारतो आणि त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो.
This is the craziest shit I’ve ever seen 😳 pic.twitter.com/XuuMorevxe
— Studio DOMO (@StudioDOMO) January 21, 2022
थोडक्यात वाचला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडामधील डेटोना बीचजवळ राहणाऱ्या वॉल्टर हिकॉक्स या व्यक्तीसोबत ही घटना घडल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अस्वल त्या व्यक्तीवर जोरदार हल्ला करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. परंतु ती व्यक्ती आपल्या कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी न घाबरता त्या जंगली अस्वलाचा सामना करते. यादरम्यान तो व्यक्ती त्या अस्वलाला घराबाहेर ढकलतो आणि दारासमोर घरातील बाक ठेवतो.
नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव
या घटनेबाबत त्या व्यक्तीने सांगितले की, अस्वलाने हल्ला केला तेव्हा त्याला दुसरे काहीच सुचले नाही, म्हणून त्याने थेट त्याचा सामना केला. त्यावेळी तो अस्वल खूप आक्रमक झाला होता आणि त्याला त्या कुत्र्यांची शिकार करायची होती. पण, सुदैवाने त्या पिल्लांचा जीव वाचला. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझनकडून त्या व्यक्तीचे कौतुक केले जात आहे.