भंगारवाल्याकडून खरेदी केलेल्या सोफ्यात सापडले लाखो रूपये, पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:33 PM2020-01-23T12:33:53+5:302020-01-23T12:36:21+5:30
कधी कुणाचं नशीब कधी चमकेल हे काही सांगता येत नाही. कधी कुणाला समुद्रात मोती सापडतात तर कुणाला पुरलेलं सोनं सापडतं.
कधी कुणाचं नशीब कधी चमकेल हे काही सांगता येत नाही. कधी कुणाला समुद्रात मोती सापडतात तर कुणाला पुरलेलं सोनं सापडतं. पण अमेरिकेतील एका व्यक्तीचं भंगारावाल्याकडून खरेदी केलेल्या सोफ्याने नशीब बदललं. ही व्यक्ती सोफ्यावर बसताच त्यात काहीतरी असल्याचं त्याला जाणवलं आणि त्याला जे दिसलं ते पाहून तो थक्क झाला. पण त्यानंतर त्याने जे केलं ते तुम्हाला थक्क करणारं आहे.
news18.com ने खलीज टाइम्सच्या दिलेल्या वृत्तानुसार, सोफ्याच्या गादीतून या व्यक्तीला ४३ हजार डॉलर म्हणजेच साधारण ६६ लाख ४४ हजार रूपये मिळाले. इतके पैसे पाहून हेवर्ड नावाची ही व्यक्ती थक्क झाली. त्यानंतर तो त्याच्या वकिलाला भेटण्यासाठी गेला. वकिलाने त्याला सांगितले की, हे पैसे कायदेशीररित्या आता त्याचे आहेत आणि तो हे ठेवू शकतो.
मात्र, हेवर्डने इमानदारी दाखवत ज्या भंगारवाल्याकडून त्याने सोफा खरेदी केला त्याच्याकडे गेला. जेणेकरून भंगारवाला हे पैसे खऱ्या मालकाकडे पोहोचवू शकेल. भंगारवाल्याच्या मदतीने हेवर्ड या पैशांची खरी मालकीन असलेल्या किमफाउथ नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. हा सोफा किमफाउथच्या आजोबांचा होता. ज्यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं.
घरातील लोकांनी हा सोफा जाळून टाकण्याचा विचार केला होता. पण नंतर एका भंगारवाल्याने तो खरेदी करण्याची इच्छा व्यक्ती केली आणि त्यांनी तो सोफा त्याला विकून टाकला. पैसे परत मिळाल्यावर महिला म्हणाली की, 'मी कधी विचारही केला नाही की, तीन पिढ्यांपासून आमच्या घरातील सोफ्यात इतकी रक्कम पडली आहे'.