बायकोच्या सँडविचवर रेस्टॉरंटने लिहिलं असं काही, नवऱ्याची झाली लाही लाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:29 PM2019-09-18T15:29:46+5:302019-09-18T15:31:12+5:30
नवऱ्यानं फेसबुकवर लिहिला अनुभव; पोस्टवर हजारो कमेंट्स
एखाद्या व्यक्तीनं तुमचं नाव चुकीच्या पद्धतीनं घेतलं तर तुम्हाला नक्कीच राग येईल. अनेकांना बऱ्याचदा हा अनुभव आला असेल. काही वेळा चुकीच्या पद्धतीनं नाव लिहिलंदेखील जातं. त्यामुळे अनेकांचा पारादेखील चढतो. असाच एक प्रकार रॉबर्ट विल्सन बार्न्स यांच्या पत्नीसोबत घडला. रेस्टॉरंटनं पार्सल देताना त्यावर लिहिलेलं नाव पाहून बार्न्स चांगलेच भडकले. त्यांनी याबद्दलचा जाब रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना विचारला आणि त्यानंतर वेगळीच बाब समोर आली. हा संपूर्ण अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
साऊथ कॅरोलियामध्ये राहणाऱ्या रॉबर्ट यांनी जिमी जॉन्स रेस्टॉरंटच्या ड्राईव्ह थ्रू काऊंटरवरुन पार्सल घेतलं. त्यांच्या पत्नीनं सँडविच ऑर्डर केलं होतं. मात्र रेस्टॉरंटजवळून निघाल्यावर रॉबर्ट यांच्या पत्नीनं सँडविच गुंडाळलेल्या कागदावरील मजकूर वाचला आणि त्यांना धक्काच बसला. कागदावर 'बिच' असं लिहिलं होतं. ते पाहून रॉबर्टदेखील खवळले. त्यांनी गाडी वळवली आणि रेस्टॉरंट गाठलं.
रॉबर्ट यांनी सँडविचमध्ये गुंडाळलेला कागद रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना दाखवत जाब विचारला. संतापलेल्या रॉबर्ट यांना पाहून कर्मचारीदेखील गोंधळले. रॉबर्ट यांनी कागदावरील मजकूर दाखवून त्याबद्दल स्पष्टीकरण विचारलं. त्यावर रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं अतिशय सोपा खुलासा केला. तुम्ही बीएलटी विथ चिज अशी ऑर्डर केल्यानं आम्ही कागदावर शॉर्टकट म्हणून BITCH लिहिलं, असं मॅनेजरनं म्हणाला.
बॅकॉन, लेट्यूस, टोमॅटोचा वापर करुन तयार करण्यात येणाऱ्या सँडविचला BLT सँडविच म्हणतात. रॉबर्ट आणि त्यांच्या पत्नीनं चीझ घातलेलं BLT सँडविच ऑर्डर केलं होतं. त्यामुळे सँडविच गुंडाळण्यात आलेल्या कागदावर BLT आणि CH लिहिण्यात आलं होतं. सँडविच पॅक करणाऱ्या व्यक्तीनं ही पाचही अक्षरं सलग लिहिली होती. त्यामुळे ती वाचल्यावर रॉबर्ट संतापले. रॉबर्ट यांनी याबद्दलची पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. तब्बल ७४ हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तर १८ हजार लोकांनी यावर कमेंट केली आहे.