ऐकावं ते नवलच! पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता?; 26 लाखांचं बिल पाहून लोक झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:01 PM2022-06-16T12:01:15+5:302022-06-16T12:06:59+5:30
एका व्यक्तीला पाण्याचं भलमोठं बिल आहे. पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खाली जात असून अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होते. अनेक भागात आजही लोकांना कडक उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे पाणी हे जीवन आहे असं म्हणत ते जपून वापरण्याचं आवाहन हे नेहमीच केलं जातं. विजेसारखं पाण्याचं देखील बिल येतं. पण तुम्हाला जर कोणी एखाद्या व्यक्तीला तब्बल 26 लाख रुपये पाण्याचं बिल आलंय असं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे.
एका व्यक्तीला पाण्याचं भलमोठं बिल आलं आहे. पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मलेशियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला आलेल्या पाण्याच्या बिलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिलातील आकडा पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण व्यक्तीला हजार, दोन हजार नाही तर तब्बल 26 लाखांचं पाणी बिल आलं आहे. या व्यक्तीने "We Are All People From Raub" नावाच्या पेजवर हे बिल शेअर केलं आहे. तसेच मी बँकरप्सीसाठी अर्ज करू शकतो का? अशी कॅप्शन त्याने फोटो शेअर करताना दिली आहे.
पाण्याचं हे बिल व्हायरल झाल्यानंतर पाणी वितरण विभागाची ही चूक असू शकते, असं म्हटलं जातं आहे. एक व्यक्ती एवढ्या किमतीचं पाणी वापरूच कशी शकते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या व्यक्तीने सुमारे 99,740m3 पाणी वापरल्याचं बिलात लिहिलं आहे म्हणजेच दीड लीटर कोल्ड्रिंकच्या बाटलीत एवढं पाणी भरलं तर त्यात तब्बल 6 कोटी 64 लाख 93 हजार 333 बाटल्या भरल्या जातील.
लाखो रुपयांचं पाणी बिल पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बिलावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा माणूस काय काम करतो की त्याने इतकं पाणी वापरलं अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरा एक जण म्हणाला, कदाचित याच्यामुळेच माझ्या घरात पाणी येत नाही. त्याचबरोबर अनेकांनी गंमतीत त्यांच्या घरी पाणी नसण्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं आहे. तर आणखी एकाने ही व्यक्ती नक्कीच वॉटर पार्क चालवत असणार, कारण त्याशिवाय इतकं बिल येऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.